भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच टोकाची गटबाजी असलेल्या वर्धा जिल्ह्य़ाचे आव्हान स्वीकारताना आमदार देवेंद्र फ डणवीस यांना माजी खासदार सुरेश वाघमारे यांचे पंख छाटत डॉ. गोडे गटाला प्राधान्य देण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. माजी खासदार सुरेश वाघमारे हे सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना प्रदेश उपाध्यक्ष होते. आमदार फ डणवीस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना मूळ नियुक्ती कायम राहण्याची खात्री होती, पण त्यांची गच्छंती झाली. आमदार रामदास तडस यांची वर्णी लागली.
जिल्ह्य़ाच्या कुणबी-तेली अशा सामाजिक अंग असलेल्या राजकीय धृवीकरणात जिल्हाध्यक्षपदी डॉ. शिरीष गोडे यांना नेतृत्वाने फे रनियुक्ती दिली आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीवर तेली समाजाचा पक्षीय चेहरा म्हणून नियुक्ती मिळण्याची वाघमारेंना खात्री होती, पण त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत दिसून आलेला विरोध पाहून आमदार फ डणवीसही चक्रावून गेले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आ. फ डणवीस हे एका अराजकीय कार्यक्रमास वध्र्यात प्रथमच आले. सुरेश वाघमारे व अविनाश देव गटाच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली तेव्हा गटबाजीचे प्रत्यंतर त्यांनी अनुभवले. आमदार दादाराव केचे, जिल्हाध्यक्ष डॉ. गोडे, जिल्हा परिषदेचे गटनेते श्याम गायकवाड, रामदास तडस, जिल्हा परिषदेच ज्येष्ठ सदस्य मिलिंद भेंडे, माधव कोटस्थाने व अन्य भाजप नेते या कार्यक्रमास गैरहजर राहिले. प्रदेशाध्यक्षांसोबत औपचारिकही भेट न घेणाऱ्या या नेत्यांचा आक्रोश वाघमारेंविरोधात होता, हे लपून राहले नाही. यानंतर वाघमारेविरोधी सर्व नेत्यांनी फ डणवीस यांची नागपुरात भेट घेतली. तीन वर्ष प्रदेश उपाध्यक्ष राहणाऱ्या वाघमारेंच्या निष्क्रियतेचा पाढा वाचण्यात आला. प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या मुनगंटीवारांनी वाघमारेंना एकही जिल्ह्य़ाचे प्रभारीपद, निरीक्षक किंवा कसलीच जबाबदारी दिली नव्हती. जिल्हा कार्यक्रमातील त्यांच्या उदासिनतेचे किस्से सांगण्यात आले. पक्षाकडून प्रत्येक व्यक्तीगत ईच्छा पूर्ण करवून घेणाऱ्या वाघमारेंनी पक्षाला आजवर काय दिले? असा सवाल करण्यात आला. तक्रारींचा हा पाढा आमदार फ डणवीस यांनी निमूटपणे ऐकला, पण सामाजिक समतोल राखण्यासाठी नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत फ डणवीस यांनी मांडताच उपस्थित सर्व नेत्यांनी रामदास तडस यांचा एकसुरात घोषा केला. वाघमारे उतरले, तडस चढले, वादळ शमले. वाघमारे गटाला हा दुसरा धक्का समजला जातो. यापूर्वी त्यांचे समर्थक कमल कुलधरिया यांची शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
या बदलाबाबत सुरेश वाघमारे यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षांचा निर्णय मान्य आहे. आपण त्याचे स्वागतच करतो, एवढे बोलून त्यांनी अधिक भाष्य टाळले. नव्या कार्यकारिणीत फ क्त रावसाहेब दानवे यांनाच घेण्यात आले आहे.
वाघमारेच नव्हे तर हंसराज अहीर, संजय धोत्रे व अन्य सर्व उपाध्यक्षांना वगळण्यात आले आहे. यांना पक्ष संघटनेची नव्हे तर अन्य जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. वाघमारे विरोधकांनी थोडी वाट पाहावी, असा सल्लावजा टोला एका कट्टर समर्थकाने लावला. पक्षाला वर्धा जिल्ह्य़ात सुगीचे दिवस आले आणि गटबाजीचेही रोपटे लागले. सर्वाधिक जिल्हा परिषद व पालिका सदस्य असणाऱ्या भाजपला वर्धा जिल्ह्य़ात आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या पाश्र्वभूमीवर वाघमारे विरोधकांची बाजू मान्य करण्याची भूमिका पक्षनेतृत्वाने घेतल्याचे म्हटले जाते. रामदास तडस, सुरेश वाघमारे, मिलिंद भेंडे हे पक्षांतर्गत संभाव्य उमेदवार म्हटले जातात. त्यामुळे उमेदवारी निश्चित करण्याच्यावेळी ही गटबाजी परत रंगतदार ठरण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
तडसांच्या वर्णीने वाघमारे गटाला दुसरा धक्का
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच टोकाची गटबाजी असलेल्या वर्धा जिल्ह्य़ाचे आव्हान स्वीकारताना आमदार देवेंद्र फ डणवीस यांना माजी खासदार सुरेश वाघमारे यांचे पंख छाटत डॉ. गोडे गटाला प्राधान्य देण्याची शस्त्रक्रिया करावी लागली.
First published on: 24-05-2013 at 03:30 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waghmare group got second hit due to appointment of tadas