पेडर रोडवरील प्रस्तावित उड्डाणपुलामुळे त्या परिसरातील (उच्चभ्रू) नागरिकांना वाहनांच्या कण्र्याचा आणि एकूणच रहदारीच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी ध्वनिरोधक यंत्रणा (नॉइज बॅरियर) बसविण्याचे ठरविण्यात आले. परंतु शहरात अन्यत्र बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांमुळे त्या त्या परिसरातील रहिवाशांसाठी आधी ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्याची मागणी तेव्हा समोर आल्याने या उड्डाणपुलांवर ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ही यंत्रणा बसविण्याचा मुहूर्त वर्षभराने पुढे ढकलला गेला असून त्यासाठी केलेली ३७ कोटींची तरतूदही वाया जाणार आहे. ही यंत्रणा बसविण्यासाठी आता सध्याचे आवाजाचे प्रमाण मोजण्याचे ठरले असून ते काम केंद्रीय अनुसंधान संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहर व उपनगरात ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यामुळे खासगी गाडय़ांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आणि उड्डाणपुलावरील गाडय़ांची ये-जा, त्यांच्या हॉर्नचे आवाज यामुळे पुलाच्या आसपासच्या रहिवाशांना सतत गोंगाटाचा त्रास सहन करावा लागतो. वाहनांच्या आवाजाचा त्रास रस्त्याच्या आसपासच्या रहिवाशांना होत असल्याने ध्वनिरोधक यंत्रणा बसवून ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचे ठरले होते. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने मार्च २०१३ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षांत ३७ कोटी ६० लाख रुपयांची तरतूदही केली. शीव, किंग्ज सर्कल, हिंदमाता, लालबाग या डॉ. आंबेडकर मार्गावरील चार उड्डाणपुलांवर व चेंबूर येथील सुमननगर व मुलुंड येथील नवघर अशा एकूण सहा उड्डाणपुलांवर ही ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
प्रत्येक ठिकाणच्या परिस्थिती व आवाजाच्या पातळीनुसार ध्वनिरोधक यंत्रणा कोणती वापरायची, त्याचा आराखडा कसा असावा हे ठरत असल्याने त्यानुसार वेगवेगळय़ा उड्डाणपुलांवर वेगवेगळी यंत्रणा बसवावी लागेल. त्यासाठी सल्लागार नेमून अहवाल मागण्यात येत आहे. ते काम नवी दिल्लीतील केंद्रीय अनुसंधान संस्थेला देण्यात आले आहे.
ध्वनिप्रदूषणाची सध्याची पातळी व ती किती कमी करायची याचा अहवाल येण्यास आणखी काही महिने लागतील. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होऊन मग प्रत्यक्ष काम सुरू होईल. या सर्व प्रक्रियेत आता आणखी वर्षभर जाईल. त्यामुळे यावर्षी उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्याची योजना आता रखडली असून उड्डाणपुलांच्या आसपासच्या रहिवाशांना आणखी वर्षभर तरी हा त्रास सहन करत बसावा लागणार आहे.
उड्डाणपुलांवरील ध्वनिरोधकांसाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा
पेडर रोडवरील प्रस्तावित उड्डाणपुलामुळे त्या परिसरातील (उच्चभ्रू) नागरिकांना वाहनांच्या कण्र्याचा आणि एकूणच रहदारीच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी ध्वनिरोधक यंत्रणा (नॉइज बॅरियर) बसविण्याचे ठरविण्यात आले.
First published on: 16-03-2013 at 12:23 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wait for a year for soundproofing of over bridge