पनवेलमध्ये छोटाशिशू ते पहिलीसाठी ऑनलाइन प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. पनवेलमधील ७९ विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन तंत्र वापरले जाणार आहे. विशेष म्हणजे यामुळे वंचित आणि दुर्बल घटकांतील पाल्यांना याचा फायदा मिळणार आहे. पनवेलच्या गटशिक्षण अधिकारी मीना यादव यांनी यासाठी शिक्षण संचालकांकडे पाठविलेला २५ टक्के कोटा मंजूर झाल्यानंतर मंगळवारपासून ‘जागो पालक जागो’ हा उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला आहे.
एस.सी. आणि एस.टी. जातीच्या प्रवर्गातील आणि ज्यांचे उत्पन्न एक लाखांच्या खाली आहे अशा पाल्यांना चांगल्या विद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यालयांकडे शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर सरकारी कोटय़ातून कोणत्याही पालकांनी अर्ज न केल्याची सबब देण्यात येते. मात्र ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे पनवेलमधील ७९ विद्यालयांमधील नवीन दाखला घेणाऱ्या ६ ते ७ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. पनवेलच्या शिक्षण विभागाने यासाठी मंगळवारी तालुक्यातील सीबीएसी मंडळ व विनाअनुदानित तत्त्वांवर चालणाऱ्या विद्यालयांची नोंदणी सत्र ठेवले आहे. या वेळी या विद्यालयांना ऑनलाइन प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने तालुक्यातील विविध पाच ठिकाणी पालकांसाठी मागदर्शन केंद्रे सुरू केल्याची माहिती शिक्षणाधिकारी यादव यांनी दिली. खारघर येथील ग्रीनफीन्ग्र्स, कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय, पनवेलमधील वि. ख. विद्यालय, नवीन पनवेल येथील सिकेटी, खांदा कॉलनी वासुदेव बळवंत फडके आणि कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात हे केंद्र ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. ऑनलाइन महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर पालक अर्ज भरू शकतात. अधिक माहितीसाठी मागदर्शन केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी यादव यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा