आजच्या महिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात संगणकावर किंवा मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून घरोघरी हवी ती माहिती मिळत असली तरी कुठला सण केव्हा आहे, त्या दिवशी तिथी कोणती आहे.. थोर पुरुषांची आणि संतांची पुण्यतिथी, जयंती यासह प्रत्येकमहिन्यातील राशीभविष्य व दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी आज घरोघरी दिनदर्शिके शिवाय पर्याय नाही. २०१४ वर्ष संपायला चार दिवस शिल्लक असून नवीन वर्षांला प्रारंभ होताच घरोघरी, सरकारी, निमसरकारी कार्यालयातील भिंतीवर दिनदर्शिका लावली जाणार आहे. या व्यवसायात दरवर्षी कोटय़वधीची आर्थिक उलाढाल होत आहे.
बाजारात आगळेवेगळे स्वरूप देऊन विविध प्रकाशकांच्या दिनदर्शिका बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. नववर्षांचे भविष्य, पंचांग जाणण्याची सर्वसामान्याला उस्तुकता असते. त्यामुळे दिनदर्शिका घरात असणे काळाची गरज बनली आहे. दिनदर्शिकेचा इतिहास जुना असला तरी काळाच्या प्रवाहाबरोबर तिचे स्वरूप बदलले आहे. काही वर्षांपूर्वी मिळणाऱ्या दिनदर्शिकेत धार्मिक देवदेवता, क्रीडापटू, निसर्ग आदींच्या छायाचित्रांना पसंती होती. तारीख पाहण्यासाठी बारा महिन्यांचे बारा स्तंभ होते. त्यामुळे भविष्य, पंचांग व इतर महत्त्वपूर्ण माहिती मिळत नसे. गेल्या १० वर्षांत छायाचित्रे असलेली दिनदर्शिका कालबाह्य़ झाली असून ६ ते १२ पानी भरगच्च माहिती असलेली दिनदर्शिका ग्राहक ३० ते १०० रुपये देऊन खरेदी करू लागला आहे. कालनिर्णय, निर्णयसागर, महालक्ष्मी, हिंदू चेतना, सनातन सभा यासह विविध संस्थांच्या दिनदर्शिका विविध प्रकाशकांनी बाजारात आणल्या आहेत. केवळ गेल्या काही वर्षांत वर्षभर घरात असणा दिनदर्शिकेचे स्वरूप बदलले असून ग्राहकांची गरजपूर्ती ओळखून ती तयार करण्यात आली आहे. सण, उत्सव, जयंती, पुण्यातिथी केव्हा आहे हे पाहण्याव्यतिरिक्त आरोग्य आणि सामान्य ज्ञान असलेली माहिती दिली जाते त्यामुळे त्याचा घरातील लहानांपासून मोठय़ांना त्याचा लाभ होतो.
पूर्वी कालनिर्णयाचा बोलबाला असताना आज विविध हिंदू संघटनांनी दिनदर्शिका प्रकाशित केली असून त्यात विविध संतांची, देवदेवतांची आणि थोर पुरुषांची चित्र आहेत. हिंदू समाजाच्या परंपरेनुसार खरे तर गुढीपाडवापासून नवीन वर्षांला प्रारंभ होत असतो. काही संस्था जानेवारीपासून नवीन वर्षांची दिनदर्शिका तयार केली जाते. नवीन वर्षांच्या दिनदर्शिकामध्ये पंचाग, लग्न, मौंज मुहूर्त, लहान मुलांनी स्वच्छतेबाबत घ्यायवयाची काळजी, आरोग्यविषयक आणि वेगवेगळे खाद्य पदार्थ तयार करण्यासंदर्भातील माहिती, महापुरुषांची छायाचित्रे आदी विषयांवरील माहिती आहे.
काही खासगी प्रकाशकांनी एका विशिष्ट विषयावर दिनदर्शिका तयार केली आहे. याशिवाय चित्रपट अभिनेते, पर्यटन स्थळे, लहान मुलांचे छायाचित्र असलेली दिनदर्शिका बाजारात विक्रीसाठी आली आहे. विविध कंपन्याच्या टेबल दिनदर्शिकाही मोठय़ा प्रमाणात बाजारात विक्रीला आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत विविध दैनिके आणि साप्ताहिके दिनदर्शिका तयार करून वाचकांना देण्याचा प्रयत्न करू लागली आहे. वर्षांच्या शेवटी अंकासोबत दिनदर्शिका दिली जात असून त्यात नागरिकांना हवी असलेली माहिती, रेल्वे, एसटीचे वेळापत्रक, शहरातील महत्त्वाच्या संस्थाचे दूरध्वनी व संबंधित विभागाची माहिती दिली जाते. भविष्य, पंचांग, रेल्वे-बस टाईमटेबल, तेजी-मंदी, विविध सण-उत्सव, नामवंत लेखकांचे लेख, किचनचा मेनू, योगासने, विवाह मुहूर्त हे सर्व एका दिनदर्शिकेमध्ये असल्याने ग्राहक ती खरेदी करू लागला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या दिनदर्शिकेमध्ये एक ते दोन रुपयांची वाढ होते. गेल्या काही वर्षांत काही संघटनांच्या दिनदर्शिकेचा खपही वाढू लागल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेगळे काही तरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. वेळ पाहण्यासाठी घडय़ाळाचा वापर होतो त्याप्रमाणे घरा-घरात दिनदर्शिके चा वापर होऊ लागला आहे.
भिंतीवरी दिनदर्शिका हवीच!
आजच्या महिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात संगणकावर किंवा मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून घरोघरी हवी ती माहिती मिळत असली तरी कुठला सण केव्हा आहे, त्या दिवशी तिथी कोणती आहे..
आणखी वाचा
First published on: 27-12-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wall calendar must