‘वामन हरी पेठे सन्स’चे एक महत्त्वाचे आधारस्तंभ असलेल्या श्रीधर गणेश पेठे यांची जन्मशताब्दी गुरुवार, १६ मे रोजी आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘वामन हरी पेठे सन्स’तर्फे एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पारंपरिक मराठी अलंकारांमध्ये नवीन कल्पना आणि डिझाईन्स निर्माण व्हावेत या उद्देशाने या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी पारंपरिक मराठी दागिन्यांमध्ये नवीन कल्पना, डिझाईन्स कागदावर रेखाटून त्याच्या दोन प्रती वामन हरी पेठे सन्सच्या कोणत्याही शाखांमध्ये जाऊन सादर करायच्या आहेत. सादर करण्यात आलेल्या सर्व कल्पनांची छाननी करून सवरेत्कृष्ट डिझाईनची निवड करण्यात येणार आहे. गुरुवार, १६ मेपासून सुरू होणारी ही स्पर्धा १६ जूनपर्यंत घेण्यात येणार आहे. विजेत्या व्यक्तीस कै. श्रीधर गणेश पेठे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिक्षणाची व वयाची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही, असेही वामन हरी पेठे सन्सने पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे.
स्पर्धेची डिझाईन्स वामन हरी पेठे सन्सच्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, घोडबंदर रोड, घाटकोपर, भांडुप, दादर, पनवेल, पुणे, औरंगाबाद, सोलापूर अशा राज्यातील विविध ठिकाणच्या शाखांमध्ये सादर करता येणार आहेत. वामन हरी पेठे या प्रसिद्ध ब्रॅण्डचे जनक गणेश हरी पेठे यांचे पुत्र श्रीधर गणेश पेठे यांनी वयाच्या विसाव्या वर्षीच आपले वडील व काका यांच्या मदतीसाठी सुवर्णपेढीच्या व्यवसायात प्रवेश केला.
दूरदृष्टी आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर व्यवसायात आधुनिकता आणणे, ब्रॅण्ड सर्वदूर पोहोचविणे, व्यावसायिक सुसूत्रता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, कामगारांची काळजी घेणे, व्यवसाय तसेच दुकानांची संख्या वाढविण यात श्रीधर गणेश पेठे सदैव कार्यरत राहिले.
 पारंपरिक कारागीरांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. म्हणूनच पारंपरिक मराठी अलंकारांमधील नवीन कल्पना आणि डिझाईन्सची स्पर्धा घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा