धनसंपत्तीप्रमाणे ज्ञान वारसाने प्राप्त होत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. तंत्रज्ञानामुळे अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या. परंतु तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केल्यास स्त्रीभ्रूणहत्येसारखे गुन्हेही घडतात. केवळ उच्चविद्याविभूषित असून उपयोगाचे नाही, तर त्याच्या जोडीला नीतिमूल्यांचे आचरणही महत्त्वाचे आहे. ही मूल्ये रुजविण्यास शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकदिनी जाहीर केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात पालकमंत्री क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, युद्धाजित पंडित, महादेव जाधव, जयाताई गुंड, रमेश आडसकर, मदनराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर आदी उपस्थित होते. या वेळी दोन वर्षांतील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मंत्री क्षीरसागर म्हणाले, की स्पध्रेच्या व संगणकयुगात विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे. नीतिमूल्यांची जोपासना करण्यासाठी संस्कारही आवश्यक आहेत. त्यांचा अंगीकार केल्यासच चांगली पिढी निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात प्रगती करावी, यादृष्टीनेही प्रयत्न झाले पाहिजेत. पुरस्कारप्राप्त शिक्षकांकडून प्रेरणा घेऊन इतर शिक्षकांनीही चांगले काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच शिक्षक व शिक्षण विभागातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. शिक्षण व आरोग्य सभापती संदीप क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात जि.प.च्या शाळांचा दर्जा वाढविण्यास प्रयत्न सुरूअसून, सेमी इंग्लिशची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. रिक्त पदे भरली असून मराठी व उर्दू माध्यमांसाठी मुख्याध्यापकांची नेमणूक करण्यात आल्याचे सांगितले. शिक्षण अधिकारी सुखदेव सानप, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानूरकर आदी या वेळी उपस्थित होते.
शिक्षणासह नीतिमूल्यांची जोपासना हवी- क्षीरसागर
धनसंपत्तीप्रमाणे ज्ञान वारसाने प्राप्त होत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. तंत्रज्ञानामुळे अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या. परंतु तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केल्यास स्त्रीभ्रूणहत्येसारखे गुन्हेही घडतात. केवळ उच्चविद्याविभूषित असून उपयोगाचे नाही, तर त्याच्या जोडीला नीतिमूल्यांचे आचरणही महत्त्वाचे आहे.
First published on: 20-09-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want foster of ethics with education kshirsagar