‘खल्लास गर्ल’ म्हणजे ईशा कोप्पीकर हे प्रेक्षकांना ठाऊक आहे. सशक्त अभिनय करणारी ही मराठमोळी अभिनेत्री आता मराठी चित्रपट करतेय. रुईया महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर १९९५ साली मिस इंडिया स्पर्धेत मिस टॅलेण्ट किताब, जाहिरातीमध्ये मॉडेलिंगचे यशस्वी करिअर, फॅशन डिझायनर अनिता डोंगरेंच्या शोमधील आघाडीची मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सुरुवातीला कन्नड, तामिळ चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर झळकलेली मराठी अभिनेत्री ईशा कोप्पीकर २००० सालादरम्यान ‘फिजा’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये अवतरली. अनेक चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर आता ती ‘मात’ या मराठी चित्रपटात पदार्पण करतेय. ‘रविवार वृत्तान्त’शी तिने केलेल्या मनमोकळ्या गप्पा..
‘मात’ या तुझ्या पहिल्या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल काय सांगशील?
‘मात’ चित्रपटाची पटकथा ऐकल्यानंतर भूमिका खूप आवडली. हा नायिकाप्रधान चित्रपट असून आव्हानात्मक भूमिका, अभिनयाला भरपूर वाव होता. मुख्य म्हणजे मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन असे मनापासून वाटले. म्हणूनच भूमिका स्वीकारली. मराठी संस्कृती-परंपरा, त्याचे म्हणून एक सांस्कृतिक मूल्य असते. ते या व्यक्तिरेखेत, चित्रपटात आहे. त्याचबरोबर या भूमिकेला ग्लॅमरही आहे. त्यामुळेच  हा चित्रपट स्वीकारला.
राम गोपाल वर्मा, फरहान अख्तर अशा दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी तुला मिळाली. कसं पाहतेस तू याकडे? काय वाटतं दिग्दर्शकांच्या भिन्न शैलीबद्दल..
राम गोपाल वर्मा सर्वसाधारणपणे अंडरवर्ल्ड, थरारपट, भयपट या पद्धतीचे चित्रपट दिग्दर्शित करतात. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच धमाल होता. वैशिष्टय़पूर्ण  दिग्दर्शन शैली आणि कथाविषय ‘टिपिकल’ असल्यामुळे बंदिस्त पटकथा असलेले चित्रपट त्यांच्याबरोबर केले. फरहान अख्तरची दिग्दर्शन शैली म्हणजे वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी. लक्ष्य, दिल चाहता है, रॉक ऑन हे त्यांचे चित्रपट म्हणजे वैविध्यपूर्ण विषय आणि त्याची तितकीच अनोखी हाताळणी ही वैशिष्टय़ं म्हणता येतील. फरहान अख्तर यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या भावनांशी अनुरूप असेच वैविध्यपूर्ण विषय ते आपल्या चित्रपटांतून मांडतात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे फरहान अख्तरच्या सिनेमात काम करताना आम्ही सगळ्या युनिटला घेऊन खूप मजा केली. अभिनेत्री म्हणून फरहान अख्तरसोबत काम करायला खूपच मजा येते यात शंकाच नाही. चित्रीकरण संपलं की खूप धमाल करायचो. त्याचा चांगला परिणाम होतो. धमाल-मौज-मस्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रीकरणाच्या वेळी मीच काय प्रत्येक कलावंत उत्साहात असायचा आणि त्यामुळे अभिनय अधिक चांगला व्हायचा.
हिंदीत बडे बॅनर, बडे निर्माता-दिग्दर्शक यांच्याबरोबर काम केल्यानंतर मराठीत काम करताना काय फरक जाणवतो?
निर्मितीमू्ल्य, तंत्रज्ञान म्हणाल तर काही विशेष फरक जाणवला नाही. याचे कारण आमचे डीओपी म्हणजे छायालेखक निर्मल जानी हे बॉलीवूडमध्ये यापूर्वीपासून आहेत. त्यामुळे कामाची पद्धत बदलली नाही. सेटवरचे वातावरण मात्र मराठी आहे कारण चित्रपटच मराठी आहे. चित्रपटाचे ‘मेकिंग’मध्ये फरक जाणवला नाही. आमची सगळी टीम हिंदीत काम करणारीच होती. त्यामुळेही मराठी-हिंदी असा फरक वाटला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुला आवडलेली तुझी भूमिका ..
‘एक विवाह ऐसा भी’ चित्रपटातील भूमिका खूप आव्हानात्मक होती. ‘शबरी’ चित्रपटातील माझी भूमिका. खरं तर मला भूमिका आवडली तरच मी तो चित्रपट करते. त्यामुळे मी साकारलेल्या सगळ्याच भूमिका आवडलेल्याच होत्या.
तुझा वीकपॉइंट कोणता?
वैविध्यपूर्ण पदार्थ खाणे हा माझा वीकपॉइंट म्हणता येईल.
आणखी नवीन उपक्रम कोणते आहेत?
अगदी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या प्रोजेक्टवर काम सुरू असल्यामुळेच सध्या हिंदी सिनेमात मोठय़ा प्रमाणावर कार्यरत नाहीये. मुंबईकरांसाठी आरोग्यदायी जेवण, आरोग्यदायी तरीही चवदार, चटपटीत अनेकविध चवींचे पदार्थ सादर करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. त्याची अधिकृतरीत्या घोषणा लवकरच करणार आहे. ‘हॉस्पिटॅलिटी’ क्षेत्रात नवीन प्रोजेक्टसाठी काम करतेय.
‘ड्रीम रोल’ कोणता करावासा वाटेल? आवडत्या अभिनेत्री कोणत्या?
‘ड्रीम रोल’ विचाराल तर खूप आहेत. चटकन आठवतात ते सांगते ‘कहानी’ चित्रपटातील विद्या बालनची भूमिका, ‘मदर इंडिया’मधील नर्गिसजींनी साकारलेली भूमिका अशा खूप भूमिका आहेत. आवडत्या अभिनेत्रींमध्ये स्मिता पाटील, माधुरी, काजोल, तब्बू, शबाना आझमी, ज्युलिया रॉबर्ट्स यांचा समावेश करता येईल. याचे कारण म्हणजे या सगळ्या अभिनेत्रींनी साकारलेल्या नायिकाप्रधान भूमिका आणि त्यांची अभिनयशैली खूप आवडते.
अभिनेत्रीचे करिअर आपल्याकडे खूप कमी कालावधीचे असते. त्याबद्दल काय सांगशील?
स्वत:ला ‘मेन्टेन’ ठेवले तर कलावंत अभिनय क्षमतेच्या जोरावर आपली कारकीर्द नक्कीच घडवू शकतात. अभिनयक्षमता, आत्मविश्वास आणि प्रकृती उत्तम असेल तर दीर्घकाळपर्यंत अभिनय करता येतो. अभिनेत्रींची कारकीर्द लहान असते असे म्हणता येणार नाही. ‘बागबान’मध्ये हेमामालिनी यांनी साकारलेली भूमिका उतारवयात साकारली ती प्रमुख नायिकेचीच भूमिका आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून प्रमुख भूमिका साकारता आली तर कारकीर्दही मोठी ठरू शकते. वयोमानपरत्वे तरुण नायिका साकारता येणार नाही कदाचित. परंतु, अभिनयक्षमतेच्या जोरावर प्रमुख भूमिका नक्कीच साकारता येऊ शकते.