बलसंपन्न भारताचे स्वप्न तरुण पिढीच्या हातात आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची जोड हवी. देशप्रेम व शेजाऱ्याशी बंधुभावाने वागण्याची नितांत गरज आहे. परंतु आज सगळेच जाती-धर्म-पंथाच्या चौकटी लहान करीत आहेत, अशी खंत मत बाबा भांड यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पुणे) वतीने महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार स्मृती ऐतिहासिक लेखन पुरस्कार बाबा भांड यांच्या सयाजीराव गायकवाड या कादंबरीला देण्यात आला. डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भांड म्हणाले की, काळापुढे दृष्टी असलेल्या सयाजीरावांनी भारतातील समकालीन सर्व युगपुरुषांना मदत केली. स्वातंत्र्यलढय़ात ते क्रांतिकारकांमागे हिमतीने उभे राहिले, पण याची नोंद स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात नाही. आजच्या काळात चांगला प्रशासक, चांगला लोकप्रतिनिधी, उत्तम नागरिक आणि आपल्या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने सयाजीरावांचे चरित्र, कार्य जाणून घेणे गरजेचे आहे.
डॉ. दीक्षित म्हणाले की, इतिहास माणसाच्या जीवनाला व्यापणारा विषय आहे. इतिहास लेखनासाठी प्रतिभा हवी. भांड यांनी सयाजीरावांबद्दल लिहिताना ऐतिहासिक व कल्पिताची सर्जनशील मांडणी केली आहे. त्यामुळे ही कादंबरी प्रकारात मैलाचा दगड ठरणारी आहे. नेहमीच्या मराठी ऐतिहासिक व चरित्रात्मक कादंबऱ्याहून ती वेगळी झाली आहे. डॉ. सदानंद मोरे, मसापचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, पुरस्कार समितीच्या नंदाताई, डॉ. कल्याणी दिवेकर आदी उपस्थित होते.

Story img Loader