नाटय़सृष्टीत १० हजार ७०० प्रयोग करण्याचा बहुमान मिळवणे ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी असली तरी हे यश माझे एकटय़ाचे नाही. आता ११ हजार १११ नाटय़प्रयोगाचे उद्दिष्ट गाठायचे असून ते दीड वर्षांत पूर्ण करण्याचा मानस आहे, असे नाटय़ व चित्रपट कलावंत प्रशांत दामले यांनी सांगितले. ‘माझिया भाऊजींना रित कळेना’ या नाटकाच्या निमित्ताने प्रशांत दामले नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
केवळ विक्रम नोंदविण्यासाठी नाही तर रंगभूमीची सेवा करण्यासाठी नाटकाचे प्रयोग करीत आहे. नाटक हा माझा प्राण असल्यामुळे त्यात अधिक वेळ रमण्यात मला अधिक आवडते. मुळात नाटक हा सांघिक प्रयत्न आहे. सुदैवाने चांगले लेखक, निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलावंत मिळाले. त्यांच्या भरवशावरच माझे यश आहे. नाटकाच्या यशामागे लेखकापासून ते बस चालकांपर्यंत सगळ्यांचा सारखा वाटा असतो आणि त्यांच्या भरवशावरच मला यश मिळाले असल्याचे दामले म्हणाले.
नाटय़ कलावंतांना रोजच प्रेक्षकांच्या मतदानाचा सामना करावा लागत असल्यामुळे एका प्रयोगात मिळालेले यशाचे सातत्य दुसऱ्या प्रयोगाच्याा ठेवणे आवश्यक असते. प्रत्येक नाटय़प्रयोग हा तितक्याच ताकदीने सादर करून रसिकांसमोर सादर करावा लागतो. रंगभूमी क्षेत्रात सर्वात जास्त नाटय़ प्रयोग करण्याचा मान मिळाल्यामुळे माझ्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे. रसिकांच्याकडून माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे चांगल्यात चांगली कलाकृती सादर करण्यासाठी मी प्रयत्न करीत असतो. त्यासाठी माझी दमछाक होत असेल असे अनेकांना वाटत असेल तर तसे काही नाही. हे क्षेत्र माझे आवडते क्षेत्र असल्याने रोज ५ ते ६ तास नाटक आणि ४ तास प्रवासात जातात असे एकूण १० तास नाटकासाठी असल्याने बाकीचा वेळ मित्र, सहकर्मी व घरच्यांना देतो. या  सर्व दिनक्रमामध्ये झोपेच्या वेळा निर्धारित असतात, अशी व्यस्त दैनंदिनी प्रशांतने सांगितली.
माझिया भाऊजींना रीत कळेना हे नाटक विनोदी आहे. वर्तमान परिस्थितीत आजूबाजूच्या घटनांचा आधार घेऊन नाटक तयार झाले आहे. नाटक विनोदी असले तरी त्यातून प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सव्वा कोटीच्या मुंबईत तीनशे आणि ३० लाखाच्या नागपुरात किमान दीडशे ते दोनशे रंगकर्मी आहेत. कलावंतामध्ये मतभेद असणे गैर नाही परंत मनभेद असू नये. कलावंतानी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी किमान एका उद्देशासाठी संघटित होणे गरजेचे आहे, असा संदेश दामले यांनी दिला.
नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत कलावंत वेगवेगळे पॅनलमध्ये लढत असतील तरी पॅनल केवळ निवडणुकीपुरती सिमित असू द्यावे आणि त्यानंतर एकत्र येऊन रंगभूमीची सेवा करावी असा सल्ला दामले यांनी दिला. युवकांना नाटकांकडे आकर्षित करायचे असेल तर  मल्टीपेक्सप्रमाणे सुविधा नाटय़गृहात असणे गरजेचे आहे. राज्यातील विविध भागातील नाटय़गृहाची अवस्था फारच खराब आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असेही दामले म्हणाले.

Story img Loader