शहरात ठिकठिकाणी पडलेला परंतु महापालिकेने न उचललेला कचरा आता शिवसेना तसेच मनसेमधील राजकीय द्वंदाचे कारण ठरला आहे. सत्ताधारी मनसेचे महापौर ज्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात आणि याच पक्षाचे प्रदेश सरचिटणीसांचे ज्या वकील वाडी परिसरात अलिशान हॉटेल आहे, त्याच हॉटेल समोरील कचरा कुंडीची स्वच्छता करत शिवसेनेने त्या भागातील वास्तवावर प्रकाश टाकला आहे. खुद्द महापौरांच्या प्रभागात ही अवस्था असेल तर शहराची काय स्थिती राहील, असा प्रश्न करत अस्वच्छेच्या मुद्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
शहरात महापालिकेच्यावतीने प्रभागनिहाय कचरा संकलनाचे काम घंटागाडय़ांमार्फत केले जाते. परंतु, या घंटागाडी व्यवस्थेबद्दल अनेक तक्रारी आहेत. अनेक भागात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या पोहोचत नाही. काही भागात पोहोचल्या तर त्यात नियमितता राखली जात नाही. मनमानीपणे ही व्यवस्था सुरू असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग पडलेले दिसतात. अस्वच्छतेमुळे डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा प्राद्र्रुभाव वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पक्षातर्फे खास घंटागाडी तयार करून ज्या ज्या भागात या पध्दतीने कचरा पडलेला आहे, तो उचलण्याचे काम केले जात आहे. त्या अंतर्गत सोमवारी महापौर अॅड. यतिन वाघ यांच्या प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख महेश बडवे यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या मोहिमेत निलेश कोकणे, निलेश रूपवते, सचिन भांड आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.
या प्रभागात वकील वाडीमध्ये मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांचे अलिशान हॉटेल आहे. या हॉटेल समोरील रस्त्यावर दररोज मोठय़ा प्रमाणात कचरा पडलेला असतो. तशीच स्थिती प्रभागातील अशोक स्तंभ, घनकर गल्ली, सराफ बाजार परिसरात असल्याचे बडवे यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांना नाक दाबून रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. खुद्द महापौरांच्या प्रभागात स्वच्छता राखली जात नसल्याने इतर भागांची स्थिती विचार करण्यापलीकडे गेल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. या ठिकाणचा कचरा शिवसेनेने उचलून नेला. आगामी काळात परिसरात नियमितपणे स्वच्छता न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. शिवसेना या उपक्रमाद्वारे सत्ताधारी मनसेवर स्वच्छतेच्या प्रश्नावरून अप्रत्यक्षपणे कुरघोडी करत आहे. मनसेच्या कार्यकाळात खुद्द महापौरांचा प्रभाग अस्वच्छेच्या गर्तेत सापडल्याचे या आंदोलनातून दाखवून दिले आहे. शहरातील कचरा उभय पक्षातील राजकीय वादाचे कारण ठरणार असल्याचे दिसत आहे.
कचऱ्यावरून शिवसेनेचा मनसेला ‘धक्का’
शहरात ठिकठिकाणी पडलेला परंतु महापालिकेने न उचललेला कचरा आता शिवसेना तसेच मनसेमधील राजकीय द्वंदाचे कारण ठरला आहे.
First published on: 12-11-2013 at 07:27 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: War in shivsena and mns on garbage