महापालिकेने केलेल्या प्रभाग रचनेविषयी भाजपने तक्रार केली असली तरी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे. जूनमध्ये हरकती मागविण्यात येणार आहेत. ३१ मे रोजी प्रभाग आरक्षणांची सोडत काढण्यात येणार आहे.
पालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होणे निश्चित आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने नवीन प्रभाग रचना तयार करून ती राज्य निवडणूक आयोग व सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली होती. प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या सोईप्रमाणे करण्यात आल्याची तक्रार महानगर भाजपने जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे केली होती.  
महापालिकेची ही निवडणूक नवीन नियमांप्रमाणे होणार आहे. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून येणार असून ७५ सदस्यांच्या महापालिकेसाठी ३७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. ३६ प्रभागातून प्रत्येकी दोन तर शेवटच्या प्रभागातून तीन सदस्य निवडून येतील. महिला सदस्यांची संख्या ३८ राहणार आहे. सात जून रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येऊन १५ जूनपर्यंत हरकती मागविण्यात येऊन सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. ७५ सदस्यांमध्ये ४७ सदस्य सर्वसाधारण प्रवर्गाचे त्यात २३ महिलांसाठी राखीव, अनुसूचित जातींसाठी पाच आरक्षित त्यात महिलांसाठी तीन, अनुसूचित जमातीसाठी तीन (त्यात दोन महिलांसाठी) आणि इतर मागास प्रवर्गासाठी २० (त्यात महिलांसाठी दहा) असे आरक्षणाचे स्वरूप आहे.
राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ मे रोजी नगरपालिकेत आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षणाकडे शहरातील सर्व नेते व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा