महापालिका निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी नगररचना विभागाने केलेली प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या सोयीची असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे सुरेश भोळे, अशोक लाडवंजारी यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांना निवेदन दिले आहे. आयुक्तांकडे आपण यासंदर्भात तक्रार केल्याने प्रभाग रचनेची आपणास माहितीही देण्यात येत नसल्याचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले. महापालिकेची निवडणूक ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा सप्टेंबर महिन्यात होणे निश्चित आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाकडून महापालिकेस नवीन प्रभाग रचना तयार करून सादर करण्याचे आदेश गेल्या महिन्यातच देण्यात आले होते. त्यानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने नव्या नियमानुसार प्रभाग रचना तयार करून शासनाकडे रवाना केली आहे. सदरची प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांनी पालिका उपायुक्त तसेच नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्या सोईनुसार करून घेतल्याचे भाजपचे म्हणणे आहे. निवडणूक जवळ आल्याने राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीचा खेळ आता रंगु लागला आहे. सत्ताधाऱ्यांनी आतापर्यत शहरात विकास कामांकडे केलेले दुर्लक्ष, सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यात आलेले अपयश या सर्वावर विरोधकांनी कधीही आक्रमक भूमिका घेतली नाही. परंतु आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विरोधकांनी ओरड सुरू केल्याचे पाहावयास मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा