नाशिकरोड येथील ऋतुरंग परिवारातर्फे आयोजित सुप्रिया जोशी यांच्या वारली चित्रसृष्टी प्रदर्शन आणि प्रशिक्षण कार्यशाळेतून या साध्यासोप्या चित्रशैलीची रसिकांना ओळख करून घेता आली. अस्सल महाराष्ट्रीयन अशा या चित्रशैलीचा आनंद त्यामुळे नाशिककरांना घेता आला.
चार दिवस चाललेल्या चित्र प्रदर्शनाला नाशिकरोड परिसरातील कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जोशी यांनी विविध प्रसंगांची वारली शैलीतील चित्रे रेखाटली. साधी सोपी आदिवासी वारली चित्रकला हे भारताचे कलावैभव असून महाराष्ट्राने जगाला दिलेली ही सुंदर कलात्मक देणगी आहे. कलाप्रेमींनी वारली चित्रशैली आत्मसात करण्याचे आवाहन यावेळी प्रसिध्द चार्टर्ड अकाऊंटंट मुकूंद कोकीळ यांनी केले. ऋतुरंग परिवाराने असे प्रदर्शन आयोजित करून कलेचे एक समृद्ध दालन छोटय़ांपासून मोठय़ांपर्यंत कलारसिकांना उपलब्ध करून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तारपा नृत्य, दैनंदिन जीवन, भातशेती, सण-उत्सव अशा चित्रकृतींचे रसिकांनी कौतुक केले. वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वारली चित्रकलेचा इतिहास सांगून कलेची वैशिष्टय़े, जीव्या सोमा मशे यांचे वारली चित्रकलेसाठी असणारे जागतिक योगदान, चित्रकलेची सद्यस्थिती याविषयी माहिती दिली. विविध चित्रांची प्रात्यक्षिके सादर करून वारली चित्रकला जगात लोकप्रिय ठरण्यामागील कारण स्पष्ट केले. कार्यशाळेच्या समारोपात कोकीळ यांच्या हस्ते उत्कृष्ट वारली चित्रे रंगविणाऱ्या कलाकारांना पारितोषिके देण्यात आली. तनुजा वर्तक, सलोनी शिरोडे, योगिनी राव, सायली परदेशी यांनी पारितोषिके पटकावली. प्रास्तविक राजा पत्की यांनी केले. अर्चना भार्गवे, अरूण पाटील, कविता शिरसीकर, मीना पारपियानी व पालकांतर्फे मुकुंद बळेल यांनी मनोगत व्यक्त केले. हेमंत शुक्ल यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा