वस्त्रोद्योगातील आधुनिकता व कलाकुसरीचा पारंपरिक हातमाग, खादी व्यवसाय याला चालना देण्याचा उत्तम प्रयत्न केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे. वस्त्रोद्योगातील सर्व घटकांमध्ये नवे तंत्र विकसित व्हावे यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, याकडेही अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी लक्ष पुरविले आहे. यामुळे राज्याची वस्त्रनगरी असलेल्या इचलकरंजीत अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे.
टेक्निकल अपग्रेडेशन फंड (टफ) या योजनेकडे केंद्र शासनाने २४०० कोटी रूपयांची तरतूद करीत चांगले लक्ष पुरविले आहे. तर पाचव्या पंचवार्षिक योजनेत या योजनेचा समावेश करून उद्योगामध्ये आधुनिकीकरणाची गती आणखी वाढीस लागावी, असा प्रयत्न केला आहे. त्यासाठी १ कोटी ५१ लाख रूपये इतकी भरघोस तरतूद पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. गेल्या पंचवार्षिक योजनेत यंत्रमागाचे आधुनिकीकरण करण्यास इचलकरंजी शहर आघाडीवर होते. यंत्रमागाच्या आधुनिकीकरणाचा सर्वाधिक निधी येथे आल्याने हे शहर हायटेक सिटी बनले आहे. या प्रगतीला आणखी वेग केंद्र शासनाच्या सहकार्यामुळे मिळणार असल्याची प्रतिक्रिया शटललेस लूमधारकांकडून व्यक्त होत आहे.
इचलकरंजी परिसरात चार टेक्स्टाईल पार्क आहेत. केंद्राच्या अर्थसंकल्पात टेक्स्टाईल पार्कसाठी अर्थसाहाय्य करण्याचे धोरण घेतले आहे. यामुळे या चारही पार्कसह प्रस्तावित गारमेंट क्लस्टरलाही आर्थिक लाभ होणार आहे. यंत्रमागाच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पामध्ये २४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे साधे यंत्रमाग अंशत स्वयंचलित लूम होणार आहेत. त्यामुळे कापडाचा दर्जा वाढीस लागून यंत्रमागधारकांना उत्पादित कापडावर चार पैसे जादा मिळणार आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव किरण धिंग्रा यांच्याकडे साध्या मागाचे आधुनिकीकरण व्हावे, यासाठी गेल्या कांही महिन्यात सातत्याने बैठका झाल्या होत्या. त्याचे दृश्य फळ म्हणून अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी हा चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील २० लाखांहून अधिक साध्या यंत्रमागांना अंशत स्वयंचलित होण्याचा मार्ग खुला झाला आहे. या सर्व निर्णयामुळे वस्त्रोद्योगाची प्रगती होणार असून त्याचे सर्वत्र मनापासून स्वागत केले जात आहे, असे मत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.