तालुक्यातील भिरडा येथे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई होते. ती दूर करण्यासाठी सरकारने विशेष घटक योजनेतून गावाला नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून आवश्यक निधी वितरित केल्यानंतरही काम अजून अपूर्ण आहे. ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली पंचायत समिती उपसभापतिपदावर असलेल्या विनोद नाईक यांच्याकडे दोन लाखांचा निधी पडून आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्यांना पत्र देऊन काम सुरू करण्यास कळविले आहे. काम न केल्यास शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस कारवाईचा इशाराही दिला आहे.
भिरडा येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारने २००६-०७ मध्ये विशेष घटक योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यासाठीचा निधी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला वितरित केला. समितीचे अध्यक्ष विनोद नानाराव नाईक आहेत.
ते आजमितीला हिंगोली पंचायत समिती उपसभापतिपदावर कार्यरत आहेत. त्यांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी २ फेब्रुवारीला भिरडा येथील योजनेच्या कामास सुरुवात करण्याबाबत लेखी पत्र दिले. पत्रात म्हटले आहे की, आपल्याकडे असलेल्या शिल्लक निधीतून योजनेचे उर्वरित काम १६ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सादर करावा अन्यथा आपल्याविरुद्ध शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस कारवाई करण्यात येईल. भिरडा येथील नळ पाणीपुरवठाचे काम करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी १८ जानेवारीला विनोद नाईक यांना पत्राद्वारे कळविले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा