शहरात वारंवार होणारे जीवघेणे अपघात लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक शाखेच्या विरोधात अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याकडे तक्रार केली आहे. येत्या १५ दिवसात वाहतूकीला शिस्त लागली नाही तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी बारकुंड यांना दिला.
नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले तसेच कैलास गिरवले, वसंत लोढा, संजय झिंजे, सचिन डफळ, सतीश मैड, मनोज राऊत, नितिन भुतारे, पोपट पाथरे, रमेश सानप आदींना बारकूंड यांची या विषयावर भेट घेतली व वाहतूक शाखेच्या निष्क्रियतेमुळे शहरातील वाहतूक कशी बेशिस्त झाली आहे याचा पाढाच त्यांच्याकडे वाचला. प्रमुख रस्त्यावर कोठेही पोलीस दिसत नाहीत, मात्र चांदणी चौक, कोठला, कोठी रस्ता, बसस्थानक अशा ठिकाणी ते अगदी बिनधास्तपणे मालमोटार चालकांबरोबर सौदा करण्यात दंग असतात. वाहतूक नियंत्रणासाठी असलेल्या पोलिसांना त्याचे कसलेही प्रशिक्षणच नाही. त्यामुळे रस्त्यावर गर्दी झाली की तेच गडबडतात व गायब होतात असे यावेळी सांगण्यात आले.
बारकूंड यांनी तक्रारी ऐकून घेत यात लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांना दिले. रस्त्यांवरील अतिक्रमणे, तसेच वाहनांची वाढती संख्या, अरूंद रस्ते यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत, मात्र त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. निष्क्रिय पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
उड्डाणपुलाचा विसर!
स्टेशन रस्त्यावरील नियोजित उड्डाणपुलासाठी मनसेने आंदोलन केले होते. पूल अजूनही कागदावरच आहे, मात्र या चर्चेत मनसेच्या वतीने या नियोजित उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाबाबत चकार शब्दही काढला गेला नाही.
 

Story img Loader