शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मनमानी झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार तालुक्यांतर्गत आपसी बदल्या करून हा गोंधळ कमी करण्यात आला. तरीही २६ शिक्षक अतिरिक्त ठरले. या शिक्षकांनी तत्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश बजावल्यानंतरही २३ शिक्षक आदेश पाळण्याचे सोडून यंत्रणेवर दबाव आणत आहेत. मात्र, दोन दिवसांत रुजू न झाल्यास या शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्याची तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी राजू जावळेकर यांनी दिली.
राज्य सरकारच्या आदेशानुसार ३१ मे अखेपर्यंत जि. प.त शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. यानंतर कोणतीही बदली अथवा बदल करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर नाहीत. असे असताना मोठय़ा प्रमाणात बदल्यांचा ‘बाजार’ झाला. पदाधिकारी व शिक्षकांनी मनमानी पद्धतीने पाहिजे त्या ठिकाणी झालेल्या बदल्या रद्द केल्या, तसेच सोयीच्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश काढून घेतले. मात्र, बदल्यांच्या बाजाराने पुरता गोंधळ उडाला. शाळेवर जागा पाच असताना १० ते १२ शिक्षक नियुक्त करण्यात आले. नियमानुसार झालेल्या बदल्या परस्पर रद्द करण्यात आल्या. सर्वानी शहराजवळ, घराजवळ आणि गावाजवळ सोयीच्या शाळेवर नियुक्ती करुन घेतली. या बाबतची तक्रार थेट ग्रामविकास मंत्रालयापर्यंत गेली. परिणामी विभागीय आयुक्तांनी विशेष चौकशी समिती नेमून अहवाल मागवला. मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांनी कोणाची गरसोय होऊ नये, अशी भूमिका घेतली. मात्र, याचा गरफायदा घेत शिक्षकांनी गोंधळ घातला. परिणामी तालुकांतर्गत बदल्यांमध्ये आपसी बदल्या करुन हा गोंधळ कमी करण्यात आला.
त्यानंतरही अंबाजोगाई व बीड तालुक्यांत २६ शिक्षक अतिरिक्त ठरले. या शिक्षकांना गेवराई, माजलगाव तालुक्यांत नियुक्त्या देण्यात आल्या. वरिष्ठांचे आदेश पाळण्याऐवजी या शिक्षकांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची ओरड करीत प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी दोन दिवसांत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय जावळेकर यांनी घेतला आहे.

Story img Loader