शहरातील चितळे रस्ता, दिल्लीगेट, तोफखाना, सातभाईगल्ली परिसरात ऐन सणाच्या काळात होणाऱ्या विजेच्या वाढत्या भारनियमनामुळे संतप्त झालेल्या व्यापा-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांची भेट घेऊन, येत्या आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला. या भागात अंडरग्राऊंड लाइन टाकण्याचा प्रस्ताव वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या दीड महिन्यापासून मनपाकडे रखडल्याकडे हजारे यांनी लक्ष वेधले.
नगरसेवक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर दौंडकर, चेतन अरकल, रमेश परदेशी, संदीप ब्रम्हदंडी, श्रीनिवास येनगुपटला, रूपेश दुगड, सागर घोलप, सचिन जिंदम, महेंद्र सूर्यवंशी यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. या भागात आठ-आठ तास भारनियमन होत आहे, ऐन दिवाळीच्या काळात भारनियमन वाढल्याने बाजारपेठेला मोठी आर्थिक झळ बसत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस आहेत. त्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे, रात्री वीज नसल्याने रस्त्यावरील अपघात वाढले आहेत. पूर्वी हा भाग कापड बाजार फीडरला जोडला होता. झोन बदलल्यानंतर भारनियमन वाढले आहे, वीजबिले वेळेवर अदा करूनही हा अन्याय सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात माहिती देताना अधीक्षक अभियंता हजारे यांनी सांगितले, की  कापड बाजार फीडरची लाइन अंडरग्राऊंड आहे. चितळे रस्ता, दिल्लीगेट, तोफखाना भागासाठीही अंडरग्राऊंड लाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी वीज कंपनीने मनपाकडे रक्कम जमा करून परवानगी मागितली आहे, परंतु पाठपुरावा करूनही मनपाने गेल्या दीड महिन्यांपासून संमती दिली नाही, तरीही या भागाचा ड वर्गात समावेश करून भारनियमन बंद करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे, मंजुरी मिळताच त्यावर कार्यवाही केली जाईल.

Story img Loader