केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून प्रादेशिक भाषा हद्दपार करण्याचा प्रकार लोकसत्ताने उघडकीस आणल्यावर मराठीप्रेमी राजकीय पक्षांकडून या विरोधात आंदोलनाचे इशारे देण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर शाखेने आज येथे जिल्हाधिकाऱ्यांना यासंबधीचे निवेदन दिले व हा निर्णयच रद्द करावा अशी मागणी केली.
सर्वश्री जिल्हा संघटक सचिन डफळ, विनोद काकडे, नितिन भुतारे, राजू मंगलारप, सागर कुरापट्टी, योगेश मगर आदींनी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची भेट घेतली. खासदार दिलीप गांधी तसेच पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनाही निवेदनाच्या प्रती देऊन केंद्र सरकार घेत असलेला हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षापर्यंत मराठी युवकांच्या भावना प्रभावीपणे पोहचवा असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. निर्णय रद्द झाला नाही तर मनसेच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला.
डफळ व काकडे यांनी सांगितले, की ग्रामीण मराठी युवकांसाठी तसेच शहरातीलही मराठी माध्यमातून शिकलेल्यांसाठी हा निर्णय हानीकारक आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी भाषिक मुलांचा तसेच इतरही प्रादेशिक भाषांचा टक्का वाढू लागल्यामुळेच असा निर्णय घेतला असण्याची शंका येते आहे. किमान २५ विद्यार्थी असतील तरच मराठी भाषेत परीक्षा देता येईल या नियमाला काही अर्थ नाही. ती काही परीक्षार्थी विद्यार्थ्यांची जबाबदारी नाही. मराठी युवकांना जाचक असलेला हा नियम तत्काळ रद्द केला नाही तर आंदोलन करण्यात येईल असे डफळ व काकडे यांनी सांगितले.

Story img Loader