वीज देयक भरणाऱ्या ग्राहकांना २४ तास वीज द्यावी. रोहित्र खराब झाल्यास कोणतेही कारण न सांगता तीन दिवसांत ते बसवावे. ज्या शेतकऱ्यांनी वीजबिल भरले, त्यांना तातडीने जोडणी द्यावी अन्यथा १९ नोव्हेंबरला मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी दिला.
महावितरणच्या धोरणानुसार थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांपैकी ८० टक्के ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली असेल तरच रोहित्र दुरुस्त केले जाते. मुळात हे धोरण चुकीचे आहे. ज्या ग्राहकाने वीजबिल भरले आहे, त्याला तातडीने जोडणी द्यावी. अनेकांना देयक भरूनही वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. अंदाजे देयके दिली जातात. या अनुषंगाने वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नाही. ही बाब विजेशी संबंधित तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्या निदर्शनास आणली होती. ते काहीच करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधातही स्वतंत्र तक्रार दाखल करण्याचा इशारा आमदार बंब यांनी दिला.

Story img Loader