शासनाने शिक्षण संस्थांच्या मागण्यांवर १५ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा १६ ऑगस्टपासून सर्व शाळा बेमुदत बंद ठेवल्या जातील, असा ठराव कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्थांच्या अधिवेशनात करण्यात आला. मलकापूर (ता. कराड) येथे झालेल्या या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्यकारिणीचे सदस्य आणि कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष अशोकराव थोरात होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संलग्न शिक्षण संस्थांचे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चालक अधिवेशनास उपस्थित होते. अधिवेशनास सातारा जिल्हा शिक्षण संघाचे उपाध्यक्ष अॅड. वसंतराव फाळके, शिक्षण संस्था महामंडळाचे सहकार्यवाहक हणमंत भोसले, स्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य अशोक कारंडे, भाऊसाहेब जानोळकर, एस. टी. सुकरे आदी मान्यवरांसह सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती.
अधिवेशात शिक्षण संस्थांच्या सर्व स्तरावरील प्रश्नांबाबतची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घ्यावी, असा ठरावही करण्यात आला. तसेच जुन्या धोरणाप्रमाणे थकीतसह वेतनेतर अनुदान मिळावे, शिक्षक भरतीची बंदी उठवावी असे ठरावही केले. अशोकराव थोरात म्हणाले, की राज्य शिक्षण संस्था महामंडळाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. २७ जून २०१२ रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर महामंडळाने आंदोलनाची दिशा ठरवणे गरजेचे होते, मात्र तसे सुचवले गेले नाही. महामंडळाने विभागवार मेळावे घेऊन शिक्षण संस्थांना दिशा देणे व आपले कार्य गतीने करणे गरजेचे आहे. शिक्षक भरतीच्या सीईटी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणमंत्र्यांना बैठकीस न बोलवता निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय ही बैठक कशी काय बोलावली? त्यामुळेच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा ठराव केला आहे.

Story img Loader