शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष भविष्यात एकत्र येतील का, या विषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले असताना वेळ पडल्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यास तयार राहा, असे सूचक आवाहन मनसेच्या नेत्यांनी नगरसेवकांच्या एका बैठकीत केल्याने ठाणे जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे नगरसेवकांनी तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना-भाजपला महापौर, उपमहापौरपदांच्या निवडणुकीत विजय मिळवणे सोपे गेले. मनसेच्या २७ नगरसेवकांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत संधान बांधल्यास शिवसेनेला धक्का बसू शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे.
या पाश्र्वभूमीवर येत्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीत मनसे धक्कातंत्राचा वापर करू शकते, असे वातावरण या निमित्ताने निर्माण झाले आहे.
महापौरपदाची निवडणूक अगदी तोंडावर आली असताना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी शहरात आलेल्या मनसे आमदारांनी नगरसेवकांना हे सूचक आवाहन केल्याने शिवसेना नेत्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत मनसे नगरसेवकांच्या प्रभागातील सिमेंटचे रस्ते तयार करण्याची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करायची नाहीत आणि पक्षाच्या स्थानिक नगरसेवकाला बदनाम करायचे, असे उद्योग शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केल्याचे मनसे नगरसेवकांचे म्हणणे आहे. मनसे आमदाराने आणलेल्या विकास प्रकल्पांना वेळेवर ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे नाही आणि प्रकल्प अधांतरी ठेवायचे, अशा तक्रारीही मनसेच्या स्थानिक नेत्यामार्फत करण्यात येत आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीविषयी मनसेचे स्थानिक आमदारही नाराज आहेत.
या पाश्र्वभूमीवर महापौर निवडणुकीत शिवसेनेला धक्का द्या, असा मतप्रवाह मनसेतील एका मोठय़ा गटात आहे. मागील महापौर निवडणुकीत तटस्थ राहून एक प्रकारे शिवसेनेला मदत केली. मात्र, शिवसेना नेत्यांकडून अशा प्रकारचा असहकार सुरू राहिला तर येत्या महापौर निवडणुकीत त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी तयार राहा, असे आवाहन मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याने डोंबिवलीतील मनसेच्या नगरसेवकांना स्फुरण चढले आहे. येत्या दोन महिन्यात कल्याण- डोंबिवली महापौरपदाची निवडणूक लागणार आहे. युतीचे संख्याबळ पाहता नवीन राजकीय जुळवाजुळव मनसेने केली तर महापौरपद शिवसेनेकडून जाऊ शकते. या पाश्र्वभूमीवर मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने दिलेला इशारा सूचक मानला जात आहे.
शिवसैनिक मनसेत
अंबरनाथचे माजी नगरसेवक अ‍ॅड. मारुती डेरे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० ते १५० शिवसैनिकांनी या मेळाव्यात मनसेत प्रवेश केला. अंबरनाथ शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नाराजीला कंटाळून आपण हा निर्णय घेतला असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा