‘अल्लाह पुकारू अगर कोई काम है, बंदे हजार का एक नाम है’ हा शेर ऐकवून हैदराबादच्या वारसी बंधूंनी प्रसिद्ध कव्वाली व सुफियाना गायनाने रंग भरले आणि ऋतुरंग संगीत-नृत्य व हस्तकला महोत्सवातील दुसरा दिवस रसिकांसाठी पर्वणी ठरला.
रोटरी क्लब मेट्रोच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात दुसऱ्या दिवशी हैदराबाद येथील नाझीर अहमद व नासीर अहमद या वारसी बंधूंची प्रसिद्ध कव्वाली प्रत्यक्ष ऐकण्याची संधी औरंगाबादकर रसिकांनी प्रथमच साधली. ‘तेरे ही जलवे का नाम है’, ‘हरे झंडे के शहजादे मेरे पीर दस्तगीर’, ‘मोरे अंगना मोईनुद्दीन आयो रे’ या कव्वालींतून विश्वबंधुत्वाचा संदेश देऊन प्रेक्षकांना त्यांनी अंतर्मुख केले. सुफियाना अंदाजात सादर केलेल्या रचनांमुळे व अधूनमधून पेरलेल्या शेरोशायरीमुळे ही मैफल उत्तरोत्तर रंगतदार
ठरली. महोत्सवांतर्गत आयोजित हस्तकला प्रदर्शनाला औरंगाबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. औरंगाबादसह पुणे, माथेरान, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर व ग्वाल्हेर येथून आलेल्या १८ हस्तशिल्प कलाकारांनी आपल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल्स येथे लावले आहेत. यात इंक पेंटिंग, काष्ठशिल्प, पैठणी साडीपासून तयार केलेल्या वस्तू, फुलवाती, रुखवताचे साहित्य व उन्हाळी खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संयोजिका मोना भूमकर यांनी सांगितले.
शनिवारी स्थानिक कलावंत सुधीर बहिरगावकर यांनी शास्त्रीय गायन, डॉ. संगीता शंकर यांनी व्हायोलिन वादन सादर केले. शोभा जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने समारोप झाला.

Story img Loader