सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठविल्यामुळे राज्याला एक प्रकारे सांस्कृतिक धक्का बसल्याचे चित्र रंगविले जात असले तरी ठाणे, नवी मुंबई, पनवेल, डोंबिवली, मुलुंड यांसारख्या उपनगरांमध्ये गेली अनेक वर्षे डान्सबार झोकात सुरू होते आणि तेही पोलिसांच्या डोळ्यादेखत. सांस्कृतिक नगरीचा टेंभा मिरविणाऱ्या ठाण्यातील उपवन, लुईसवाडी, वैशाली नगर, कापूरबावडी, मानपाडा परिसर पूर्वीपासूनच ‘छमछम’चे अड्डे म्हणून ओळखले जातात. सात वर्षांपूर्वी लागू झालेल्या बारबंदीनंतरही हे चित्र आजतागायत बदललेले नाही. महापे-शीळ मार्गावरील मयूर बार, पनवेल येथील कपल-चांदनी, वाशीतील संडे-मधुबन, कोपरखैरणेतील मेट्रो-नटरंग हे डान्सबार मुंबई-पुण्यातील रंगेल रसिकांसाठी ‘मोक्याची’ ठिकाणे मानली जातात. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची भाषा करत पुण्याच्या राजकारणात ‘गोल्डन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असणारा बडा राजकीय आसामी वाशीत बारबंदी असतानाही रात्री उशिरापर्यंत कसा बार चालू ठेवायचा याचे किस्से आजही मोठय़ा चवीने चघळले जातात. त्यामुळे आर. आर आबांनी डान्सबार बंदीचा काढलेला फतवा कागदावर जरी कडक भासत असला तरी प्रत्यक्षात बार बंद होते कुठे, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. महिनाभरापूर्वी दावडीनाका येथील मयूर बारवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून ६२ बारबालांना अटक केली होती. या ठिकाणी दररोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पनवेल येथील कपल बारवर मध्यंतरी ठाणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून काही कोटींची रोकड तेथून जप्त केली होती. ठाणे, कल्याण, शीळफाटा, नवी मुंबई, पनवेल अशा परिसरात मोठय़ा झोकात सुरू असलेल्या डान्सबारकडे स्थानिक पोलीस पद्धतशीरपणे कानाडोळा करू लागल्यामुळे या अवैध धंद्यांवर बाहेरून ‘आयात’ केलेले पोलीस छापे टाकू लागल्याने जिल्ह्य़ातील पोलीस यंत्रणेचे पितळ उघडे पडू लागले होते. डान्सबार बंदीचा कायदा लागू असला तरी लेडीज सव्र्हिसच्या नावाखाली जवळपास सर्वच बारमध्ये सुरू असलेले अवैध धंदे अगदी बिनधोकपणे सुरू होते.
ठाणे, मुलुंड, नवी मुंबईत बारमालकांचे अड्डे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा