विळद घाट येथील जलशुद्धीकरण केंद्रातील वाया जाणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करणाऱ्या महापालिकेच्या प्रकल्पासाठी हडकोने (हौसिंग डेव्हलपमेंट कार्पोरेशन) ५३ लाख रूपयांचे अनुदान मंजूर केले. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे यंत्र अभियंता परिमल निकम यांनी हा प्रकल्प तयार करून तो हडकोकडे सादर केला होता. मनपाने हडकोकडे कर्ज प्रस्ताव सादर केला
आहे.
त्याची माहिती घेण्यासाठी गेले असता आयुक्तांना हडकोकडून अशा प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पांना अनुदान देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी निकम यांना सांगून हा जलशुद्धीकरण केंद्रातील अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणारा प्रकल्प तयार केला.
विळद घाट येथे मनपाच्या शहर पाणी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातील यंत्रसामग्री वारंवार धुऊन स्वच्छ करावी लागते. त्यात मनपाचे दररोज साधारण १ लाख लिटर पाणी वाया जाते. हे पाणी इतके दिवस केंद्राच्या बाहेर सोडून देण्यात येत होते. आता मात्र त्याचा वापर होईल. त्यासाठी परिसरातच १० लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. या टाकीतून अशुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे जलशुद्धीकरण केंद्रातच नेले जाईल. तिथे त्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाऊन ते पाणी नेहमीच्या पाण्यात मिसळले जाईल.
लवकरच मनपा या प्रकल्पाचे काम सुरू करणार आहे. पाण्याचे दुर्भिष्य असताना मनपाला रोजचे लाख लिटर पाणी वाचवता येणार आहे ही मोठीच गोष्ट असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, प्रभारी उपायुक्त संजीव परशरामे, तसेच परिमल निकम हेही उपस्थित होते.
शहर बस सेवेला बक्षिसाची अपेक्षा
हडकोकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती मागवण्यात येते. त्याची एका विशेष समितीकडून पाहणी होऊन नंतर सर्वात आकर्षक व उपयोगी ठरत असलेल्या योजना किंवा प्रकल्पाला पारितोषिक दिले जाते. या स्पर्धेसाठी मनपाचा शहर बस सेवेचा उपक्रम पाठवण्यात आला आहे. त्याला निश्चित बक्षीस मिळेल, असा विश्वास आयुक्त कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा