* दरुगधीमुळे नागरिक हैराण
* रोगराईला आमंत्रण
* पश्चिमेतील स्वागत दरुगधीने
पालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग क्षेत्र परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून जेसीबीच्या साहाय्याने कचरा उचलून तो कचरा डम्परमध्ये टाकण्यात येतो. जेसीबीचे नांगे सतत कचरा उचलण्यासाठी कचराकुंडीच्या जागी लागतात. त्यामुळे जमीन सतत उखडली जात असल्याने कचराकुंडीच्या जागी एक ते दीड फुटाचे खड्डे तयार झाले आहेत. या खड्डय़ांमध्ये कुजलेला कचरा, पाणी तुंबत असल्याने परिसरात खूप दरुगधी पसरत आहे.
‘ह’ प्रभाग क्षेत्रातील २१ नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘ह’ आणि ‘ड’ प्रभाग क्षेत्रातील कचरा उचलण्याचे काम अॅन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग ठेकेदाराने गेल्या दोन महिन्यांपासून बंद केले आहे. याविषयी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कचऱ्याचा विषय नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात येत होता. सफाई कामगार आरोग्य निरीक्षकांना चिरीमिरी देऊन घरीच ऐषआराम करीत असल्याने पालिकेत सफाई कामगारांची मोठी वानवा आहे. अनेक सफाई कामगार खासगी सोसायटय़ा, कंपन्यांमध्ये जाऊन सफाईची कामे करीत असल्याचे सांगण्यात येते. हा कामगारांचा तुटवडा विचारात घेऊन यावर उपाय म्हणून प्रशासनाने जेबीसीच्या साहाय्याने कचरा उचलण्याची शक्कल लढविली. तीच पद्धत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे.
जेसीबीने कचरा उचलताना कचराकुंडीच्या जवळची माती सतत खरवडली जाते. माती सतत उकरणे सुरू असल्याने कचराकुंडय़ांच्या जागी दीड फुटाचे खड्डे तयार झाले आहेत. आताही वेळेवर कचरा उचलला जात नाही. त्यामुळे कुंडी आणि खड्डय़ांमध्ये कचरा कुजतो. हा कचरा उचलताना प्रचंड दरुगधी परिसरात पसरते. अनेकांना या दरुगधीमुळे उलटय़ा होतात. कचराकुंडय़ांच्या जागा आता रोगराईचे आश्रयस्थान ठरू लागल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेत तृप्ती हॉटेलसमोरील कचराकुंडी हटविल्याने तेथे जमिनीवर कचरा टाकला जातो. या ठिकाणी खड्डा तयार झाला असून रिक्षा वाहनतळावरील प्रवासी, हॉटेलमधील ग्राहक, नागरिकांना या दरुगधीचा त्रास होत आहे. या ठिकाणची कचराकुंडी का उचलली, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत नाही.
पालिका आयुक्त शंकर भिसे यांनी तातडीने ‘ह’ प्रभागातील जेसीबीने कचरा उचलण्याची पद्धत बंद करावी, अशी मागणी या भागातील जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आपली बांधकामे, टीडीआर, एफएसआय आणि उंची गाडय़ा खरेदी यामध्येच बहुतांशी नगरसेवक व्यग्र असल्याने त्यांना या लोकांच्या जीवनमरणाशी निगडित प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा