निवडणूकविषयक कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जिल्ह्य़ातील सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर अन्य १४० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी केलेल्या या कारवाईमुळे कर्मचारीवर्गात खळबळ उडाली.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सध्या राबविण्यात येत असलेल्या मतदार ओळखपत्रासह संबंधित विषयांवर व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वरील कारवाई केली. कामचुकार अधिकाऱ्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांची करडी नजर ठेवण्यात येत असल्याचे चित्र आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यात मतदार ओळखपत्र, दुबार स्थलांतरीत व मृत मतदारांच्या नोंदी वगळणे, मतदान केंद्रनिहाय अधिकाऱ्यांना द्यावयाचे मानधन, ऑनलाईन तक्रार नोंदणी, मतदान केंद्र सुसूत्रीकरणासह ९ मुद्दय़ांवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. मतदारांचे छायाचित्र संकलीत करून मतदारयादी अद्ययावत करण्याच्या कार्यक्रमाची मुदत ३० जूनला संपत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्य़ात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून ९०४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, लिपीक, शिक्षक यांचा समावेश आहे. ९५ हजार ४१३ छायाचित्रीकरणाचे संकलन करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, गेल्या अडीच महिन्यांत २२ हजार २९३ छायाचित्रांचे संकलन झाले. त्याची टक्केवारी केवळ २३.३६ असल्याने संबंधितांकडून खुलासा मागविला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करूनही प्रगती दिसून न आल्याने जिल्हाधिकारी पोयाम यांनी ग्रामसेवक व्ही. पी. खांबाळकर (तुप्पा), आर. जी. श्रावणे (वारंगाफाटा), तलाठी आर. डी. गिरी (शेवाळा), एन. एच. देशमुख (शिंदगी) झोळगे (जवळापांचाळ), कृषी सहायक एच. डी. बिच्चेवार, बी. जी. मस्के (आ. बाळापूर) या ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढले. कळमनुरी तालुक्यात १८२ पैकी १४० कर्मचाऱ्यांचे काम १० टक्क्य़ांपेक्षा कमी झाल्याने त्यांच्यावर गुन्हा का दाखल करू नये, अशी विचारणा करणाऱ्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा