महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपूर्ण राज्यात उभारलेल्या ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ व्यवस्थेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी नाशिकसह मुख्य निवडक शहरात प्रायोगिक तत्त्वावर संवाद साधला खरा, मात्र त्यांना या प्रयोगापेक्षा या वेळी पक्ष स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित मेळावा यशस्वी करण्याची अधिक चिंता असल्याचे अधोरेखित झाले. या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने मेळाव्याच्या पूर्वतयारीची जिल्हा पातळीवरील माहिती संकलित करताना त्यांनी पदाधिकाऱ्यांनी गर्दी जमविण्यासह अजून काय काय करणे अपेक्षित आहे, याविषयी सूचनाही दिल्या. सव्वाशेहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या काँग्रेसला यानिमित्ताने माहिती तंत्रज्ञान युगात वेगळे अधिष्ठान प्राप्त होणार असले तरी सर्वसामान्यांशी नव्या पद्धतीने ‘अॅप्रोच’ होताना जिल्हा कार्यालयांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी ही व्यवस्था राहील, असे दिसत आहे.
मंगळवारी प्रदेशाध्यक्षांनी या व्यवस्थेमार्फत नाशिकसह औरंगाबाद, अमरावती आदी विभागीय मुख्यालयातील काँग्रेस कार्यालयांत दिवसभरात संवाद साधला. प्रदेश काँग्रेसने उभारलेली ही यंत्रणा लवकरच नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालय आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कार्यालयाशी जोडली जाणार आहे. या पद्धतीने संवाद साधून भविष्यातील विविध उपयोगितांची चाचणी केली जात असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. २८ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या स्थापनेला १२७ वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त मुंबईतील सोमय्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य शासनाने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यामुळे या सभेस ‘वचनपूर्ती मेळावा’ असेही नाव देण्यात आले आहे. उपरोक्त सभेची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी या व्यवस्थेचा पक्षाने खुबीने वापर करण्याचा श्रीगणेशा करून भाजपच्या पावलावर पाऊल ठेवल्याचे लक्षात येते. पत्रकार परिषद झाल्यावर ठाकरे यांनी शहराध्यक्ष आकाश छाजेड व कार्यकर्त्यांशी धावता संवाद साधला. मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आली, याबद्दल माहिती जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक कार्यकर्ते येणे आवश्यक असल्याचेही बजावले. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी शहर काँग्रेसवर टाकण्यात आली आहे. मेळाव्याच्या पाश्र्वभूमीवर, स्थानिक पातळीवर बैठका सुरू असल्या तरी सोपविलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जाईल, यावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली.
देशातील राजकीय क्षेत्रात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राबविलेला हा पहिलाच प्रयोग आहे. याद्वारे प्रदेश काँग्रेस कमिटी प्रत्येक जिल्ह्याशी थेट संपर्क साधणार आहे. एखाद्या जिल्ह्यात अकस्मात काही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा अन्य काही तातडीचे विषय असतील तर संबंधित जिल्ह्याचे पदाधिकारी थेट मुख्यमंत्री अथवा मंत्रिमंडळातील इतर सदस्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू शकतील. मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांतून एकदा सर्वाना मार्गदर्शन करावे, असा प्रदेश काँग्रेसचा प्रयत्न आहे. याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करण्याचीही योजना आहे. जेणेकरून नागरिकांना आपल्या शहरातून थेट मंत्र्यांशी संपर्क साधता येईल आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जाऊ शकतील. एवढेच नव्हे तर, मुख्यालयातून प्रत्येक जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांशी दर महिन्याला चर्चा केली जाईल. स्थानिक पातळीवर पक्षाची बैठक होते की नाही, ते पाहता येईल. मंत्रिमंडळ विस्तारात ठाकरे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या ते वादग्रस्त विधाने करण्याचे टाळत आहेत. ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या पत्रकार परिषदेतही त्यांनी या व्यवस्थेने राबविल्या जाणाऱ्या नवनवीन उपक्रमांची जंत्री देताना मुंबईतील सभेवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे जाणवले.
काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयांवर आता पक्षश्रेष्ठींची नजर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपूर्ण राज्यात उभारलेल्या ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ व्यवस्थेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी नाशिकसह मुख्य निवडक शहरात प्रायोगिक तत्त्वावर संवाद साधला खरा,
First published on: 19-12-2012 at 02:43 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch of party top leaders on congress district office