पावसाळा संपला, हिवाळा सुरू झाला; मात्र तरीही आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा हे सूत्र लातूरकरांची सावलीसारखी पाठराखण करीत आहे. पाण्याचा ठणठणाट, सदोष वितरण व्यवस्था, सडलेल्या व खराब पाईपमधून येणारे पाणी घेताना होणारी कसरत, ४० टक्के पाण्याची नासाडी अशा दुष्टचक्रात लातूर शहरवासीयांची पुरती कोंडी होत आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून लातूर शहराला आठवडय़ातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. एकच दिवस पाणी येत असल्यामुळे पाणी येईल त्या वेळेस व पाणी आले तसेच साठवण्याची वेळ नागरिकांवर येते. शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन पालिकेकडून व्यवस्थित केले जात नाही. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी वितरणाची व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. सुमारे ४० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाणी वाया जाते. सडलेल्या व खराब पाईपमधून गटाराती पाणी वाहून जाते. नळाला येणारे पाणी जसे येईल तसे घेण्यावाचून नागरिकांसमोर पर्याय राहत नाही, त्यामुळे ‘पाण्या तुझा रंग कसा?’ हे गीत आळवत पाणी भरण्याची वेळ येते.
लातूर शहराला मांजरा धरणातून आलेले पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून पाठवले जाते. मात्र, शहरातील पाणी वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे नागरिकांना हे पाणी अशुद्धच मिळते! पाणी अशुद्ध का होते, याची काळजी कोणालाच नाही. पाणी वितरणाची व्यवस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवली असल्यामुळे महापालिका निवांत आहे. पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी जीवन प्राधिकरणकडेच असल्यामुळे महापालिका फक्त जीवन प्राधिकरणचा कारभार कसा चुकतो, हे सांगायला मोकळी आहे. मनपाकडे पाणीपुरवठय़ाचे काम होते, तेव्हाही हीच स्थिती होती. लोकांना पाणी कोण देते? त्याची यंत्रणा काय? याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. वर्षभराची अठराशे रुपये पाणीपट्टी येत असेल व महिन्यातून केवळ चार वेळाच पाणी दिले जात असेल, तर ते पाणी किमान शुद्ध असावे, इतकी लोकांची माफक अपेक्षा आहे.
पाणीकपात तिप्पट, पाणीपट्टीही दुप्पट!
आधीच पाण्याची मारामार, त्यात पाणीपट्टीत दुपटीचा भार असे प्रतिकूल चित्र लातूरच्या औद्योगिक वसाहतीला सध्या मारक ठरत आहे. गेल्या वर्षभरापासून केवळ ४ तास पाणी मिळते. अशा वेळी उद्योग तग धरणार कसे, हाच मोठा प्रश्न येथील उद्योगांपुढे आहे.
लातूर औद्योगिक वसाहतीत गेल्या वर्षभरापासून पाणीकपातीत तिप्पट वाढ उद्योजकांना सहन करावी लागत आहे. यंदा पाणीकपातीत वाढ झाली नाही, तरी दर मात्र दुपटीने आकारले जात असल्याने उद्योजकांचे कंबरडेच मोडले. महावितरणने उद्योजकांसाठी दरात वाढ केली. महागाईचे कारण देत जो तो दर वाढवत आहे. लातूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना गेल्या वर्षभरापासून केवळ ४ तास पाणी मिळते. अनेकांना टँकरनेच पाणी मागवावे लागते. धनेगाव धरणात पाणी नसल्यामुळे शहरवासीयांना पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करायचे, ही चिंता असल्यामुळे उद्योजकांच्या अडचणीकडे लक्ष देण्यास कोणाला वेळच नाही.
पाण्याची सोय दूरच, उलट नव्याने पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला. लातूरच्या बाजारपेठेत कर्नाटक, आंध्रातून तूर, सोयाबीन, मूग, हरभरा, उडीद आदींची मोठय़ा प्रमाणात आवक होते. सोलापूर शहर ओलांडून कर्नाटक प्रांतातील जो माल यायचा, तो सोलापूरच्या बाजारपेठेतच मोठय़ा प्रमाणात दाखल होत आहे. मंगळवारी सोलापुरात कर्नाटक प्रांतात उत्पादित होणाऱ्या नवीन तुरीची आवक २ हजार क्विंटल होती, तर लातूरच्या बाजारपेठेत ती केवळ १० क्विंटल होती.
सोलापूर, बार्शी आदी ठिकाणी कच्च्या मालाच्या उपलब्धतेमुळे मोठय़ा दालमिल सोलापुरातच सुरू होत आहेत. त्यामुळे लातूरच्या औद्योगिक वसाहतीतील डाळ उद्योग दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा २० टक्के उत्पादन घटले. लातूरचा उद्योग वाढीस लागण्यासाठी व उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळीच प्रयत्न केले गेले नाहीत, तर या उद्योगांचा ऱ्हास ठरलेला असल्याची प्रतिक्रिया डालमिल असोसिएशनचे अध्यक्ष हुकूमचंद कलंत्री यांनी व्यक्त केली.