महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी १२०८ कोटीचे सुधारित आणि १२३२ कोटी रुपयाचे प्रस्तावित अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पाणी करामध्ये प्रस्तावित वाढ करण्याचा विचार असल्यामुळे येणाऱ्या काळात नागपूरकरांसाठी पाणी महाग होण्याची शक्यता आहे. शिवाय घरोघरी गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यांवर ‘युजर चार्जेस’ लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हे दोन्ही प्रस्ताव स्थायी समितीला सादर केले असून ते सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेच्या उत्पन्न वाढीची प्रक्रिया वित्तीय वर्षांत सुरू ठेवून उत्पन्नाची बाजू मजबूत करीत असताना रस्ते, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था, प्रदूषण मुक्त शहर, आरोग्य, स्वच्छता या शहराच्या विकास योजनाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१३ मध्ये पालिकेजवळ ७.८३ लक्ष रुपयांची शिल्लक आहे. २०१३-१४ मध्ये सुधारित अंदाजपत्रकात जकात करापासून १५० कोटी, मालमत्ता करापासून २१० कोटी, पाणी १५० कोटी, बाजार वसुली ५.२६ कोटी, नगररचना विभागापासून १०१.६० कोटी आणि इतर उर्वरित बाबींपासून २२५.६२ कोटी रुपये अपेक्षित आहे.
२०१३ -१४ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात एकूण अपेक्षित खर्च १२३२. ४७ कोटी असून यात कर्मचाऱ्यांच्या वेतनावर २५४.०६, सेवानिवृत्तीवेतन ९० कोटी, संभाव्य खर्च २११.७० कोटी, विविध कामांच्या सुस्थिती व दुरस्ती खर्चासाठी ७६.८४ कोटी, भांडवली खर्च ३१३.५४ कोटी, कर्ज परतफेड ५६.६५ कोटी, इतर खर्च ५६.५८ कोटी, एनईएसला पुरक अनुदान ८० कोटी व उर्वरित बाबीवर ९३.१० कोटी अपेक्षित असून शिल्लक ८.५५ लक्ष राहण्याचा अंदाज आहे.
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचा मोठय़ा प्रमाणावरील खर्च विचार करता खर्चाच्या तुलनेत या विभागाचे उत्पन्न कमी आहे. विद्युत खर्च आणि रॉ वॉटर चार्जेसमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्न व खर्च यामध्ये संतुलन राहण्यासाठी पाणी पुरवठय़ाचे दर सुधारित करणे आवश्यक आहे त्यामुळे ५ टक्के दराने पाण्यामध्ये दरवाढ करण्याचा प्रस्ताव अंजापत्रकात विचारधीन असून मंजुरीसाठी स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
२०१० पासून थकित मालमत्ता करावर २ टक्के शास्ती आकारून मालमत्ता कराची २०११-१२ पासून वसुली करण्यात येत आहे. आतापर्यंत १२१ कोटी रुपये वसुली करण्यात आली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ कोटीने जास्त आहे. मालमत्ता करात दरवर्षी १०० कोटी वाढ अपेक्षित आहे.
महापालिका घरोघरी जाऊन कचरा गोळा करीत असून त्याची शंभर टक्के विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे कचऱ्यांवर ‘युझर चार्जेस’ आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
भांडेवाडीमधील डंपिग यार्डची क्षमता संपत असताना शहरातील अन्य भागात डंपिग यार्ड बदलविण्याच्या संदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असून त्यासाठी जागांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे नवी डंपींग यार्डसाठी १५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय पारडी पुलासाठी १० कोटी, मॉडेल सोलर सिटी ९.३० कोटी, नागनदीमधील पाण्याचे शुद्धीकरणासाठी ५ कोटी, कवी दिवं. सुरेश भटांचे साहित्य व सभागृहासाठी १० कोटी, नाना-नानी उद्यानासाठी ३.५७ लक्ष अशी तरतूद करण्यात आली आहे. शहर बससेवेच्या सक्षमीकरणासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर शहराचा दिवसेंदिवस व्याप वाढत असताना अग्निशामक विभागाला तांत्रिकदृष्टय़ा सक्षम करण्याच्या दृष्टीने आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी आणि नवीन स्थानक निर्माण करणे प्रस्तावित असून त्यासाठी १६.३७ कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. शहरामध्ये सुलभ शौचालये व स्वच्छतागृह निर्माण करण्याचा मानस असून त्यासाठी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची क्रीडा विकास धोरणासाठी ८.७८ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेचे उत्पन वाढविण्यासोबत नागरिकांना मलभूत सुविधा आणि शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल असे महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा