कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात दीड वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या नळजोडणी घोटाळ्यातील दहा कर्मचाऱ्यांविरोधात विष्णुनगर पोलिसांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या दहा कर्मचाऱ्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याचा विषय प्रशासनाने १४ सप्टेंबरच्या महासभेत माहितीसाठी सादर केला आहे.
महासभेत नळजोडणी घोटाळ्यातील आरोपीबाबत काय निर्णय होतो, याची उत्सुकताआहे. यापूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत घेण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. महासभेत अशा स्वरूपाचे प्रस्ताव प्रशासन सातत्याने मांडत आहे. त्यामुळे नळजोडणी घोटाळ्यातील दोषी कर्मचाऱ्यांसंबंधी महासभेत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दोषी कर्मचाऱ्यांमध्ये विजय पाटील(उपअभियंता), संजय अचवले (कनिष्ठ अभियंता), योगेंद्र पडवळे (कनिष्ठ अभियंता), बाळू बोराडे (व्हॉलमन), नामदेव जोशी (निवृत्त व्हॉलमन), भगवान म्हात्रे (प्लंबर), दिनेश म्हात्रे (प्लंबर), पंडित भंडारी (प्लंबर), गजानन रोठे (व्हॉलमन) यांचा समावेश आहे.
ठाणे ‘वृत्तान्त’ने दीड वर्षांपूर्वी ह प्रभागात पालिका अधिकारी, अभियंते, प्लंबर, दलाल यांच्या संगनमताने सुरू असलेला नळजोडणी घोटाळा उघडकीस आणला.नगरसेवक वामन म्हात्रे यांनी या घोटाळ्याची पहिली तक्रार पालिकेत केली होती. बनावट प्लंबरच्या नावाने खोटे सही, शिक्के तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे ९८ नळ जोडण्या देताना या दहा आरोपींनी महापालिकेची संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांच्या आरोपपत्रात आहे.
विष्णुनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. माजी पोलीस अधिकारी अरुण सोनवणे यांनी हे प्रकरण दाबून ठेवले होते. दरम्यान, या प्रकरणात अडकणारे पालिका मुख्यालयातील तीन बडे मासे पोलिसांनी चौकशीतून सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.