धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका टळला असला तरी, उपनगरात शिरलेले कृष्णेचे पाणी सायंकाळपर्यंत कायम होते. आयर्वनि पुलाजवळ कृष्णेची पातळी स्थिर असून कोयनेतील विसर्ग ३० हजार क्युसेक्सने कमी करण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली असून कोयना येथे आज दिवसभरात अवघ्या ६ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणात ९३.७८ टीएमसी पाणीसाठा झाला असून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग रविवारी दुपारी ८५४२ क्युसेक्स करण्यात आला आहे. तत्पूर्वी हा विसर्ग ३८ हजार ६०७ क्युसेक्स होता. याशिवाय चांदोली धरणातील २१ हजार १३० असणारा विसर्ग ६ हजार ८८६ क्युसेक्स करण्यात आला आहे. तर कण्हेर धरणातील विसर्ग ६०० क्युसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला आहे. यामुळे कृष्णा आणि वारणेची पाणी पातळी कमी होईल. सायंकाळी ५ वाजता पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बहे येथे ९ फूट ४ इंच, ताकारी-३४, भिलवडी-३६, आयर्वनि- ३४ फूट ६ इंच, अंकली -४१ फूट ६ इंच, म्हैसाळ-४६ फूट ६ इंच अशी कृष्णा नदीची पाणी पातळी आहे. कर्नाटक सीमेवर राजापूर बंधाऱ्यानजीक कृष्णेतील पाण्याचा विसर्ग १ लाख ७८ हजार ६९६ क्युसेक्स प्रतिसेकंद असून अलमट्टी धरणातील विसर्ग १ लाख ७१ हजार ५३० क्युसेक्स आहे.
कृष्णा नदीतील पाणीपातळी स्थिर असून गेल्या २४ तासात त्यामध्ये कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. त्यामुळे सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, दत्तनगर परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. या ठिकाणच्या २०० कुटुंबांना महापालिकेच्या शाळेत हलविण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा