जलसंधारण कार्यशाळेद्वारे आज उद्घाटन
सद्य:स्थितीतील पाणीटंचाई आणि निर्माण झालेले दुष्काळाचे तीव्र सावट, या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नांदेड येथील शाखांच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या भारतीय जल संस्कृती मंडळाची शाखा धुळे येथेही सुरू होत असून, शनिवारी सायंकाळी चार वाजता तालुक्यातील दिवाणमळा गावाच्या शिवारात लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी या संस्थेच्या कार्याची सुरुवात होत आहे.
२५० विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित राहणार असून, जलसंधारणविषयक कार्यशाळेला प्रत्यक्ष कामाची जोड देऊन हे कार्य सुरू होणार असल्याने पुढील काळात त्याची फलश्रुती प्रत्यक्ष अनुभवणे शक्य होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
येथील देशबंधू, मंजू गुप्ता फाऊंडेशन आणि महानगरपालिका   यांच्यासह    दिवाणमळा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सक्रिय श्रमदानातून भूगोल विषयाच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांच्या कार्यानुभवातून    गॅलियन    पद्धतीचे    दोन    बंधारे बांधणे   आणि लळिंग डोंगरातून निघणारे दोन ओहोळ अडविण्याचे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.
भारतीय जल संस्कृती मंडळ, शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील अवदान औद्योगिक वसाहतीमागे जलसंधारणेचे महत्त्व सांगणारे हे कार्य होणार आहे. पर्यावरण संरक्षण म्हणजे नक्की काय आणि ते कसे करावे, हा विषय महाविद्यालयाच्या चार भिंतींत मर्यादित न ठेवता जिथे अशा प्रकारची कामे करता येतील, अशा जागा निवडून तसेच प्रबोधनाला प्रत्यक्ष कार्यानुभवाची जोड देत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात येत आहे.
भारतीय जल संस्कृती मंडळ १३ वर्षे महाराष्ट्रात कार्यरत असलेली आणि आता महाराष्ट्राबाहेर वाटचाल करू इच्छिणारी संस्था आहे. प्रारंभिक अवस्थेत धुळे येथे शाखा स्थापन करताना २९ सदस्यांचा समावेश कार्यकारिणीत करण्यात आला आहे. अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे, सचिव प्रा. डॉ. संजय पाटील, खजिनदार प्रा. डॉ. जितेंद्र तळवारे आदींचा समावेश आहे.
सल्लागार मंडळात मुकुंद धाराशिवकर, वसंत ठाकरे आणि डॉ. धनंजय नेवाडकर यांसारखे जलतज्ज्ञ, कृषी पर्यावरणतज्ज्ञ आणि संशोधक व कार्यशील व्यक्तींचा समावेश आहे. कार्यशाळेला मार्गदर्शनासाठी भारतीय जल संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर उपस्थित राहणार असल्याची माहिती धाराशिवकर यांनी दिली.

Story img Loader