पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांसाठी कुकडीचे रब्बी आवर्तन आज सोडण्यात आले. मात्र, अद्याप पाणी कोणत्या तलावात सोडायचे, ते चौंडीपर्यंत जाणार की नाही, कर्जत तालुक्यातील कोळवडी उपविभागांतर्गत किती दिवस आर्वतन देणार, याबाबत कुकडीच्या अधिकाऱ्यांना कोणतेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाही. त्यामुळे अधिकारी संभ्रमात आहेत. श्रीगोंद्याचे कार्यकारी अभियंता खताळ यांचा भ्रमणध्वनी आज पाणी सुटल्यावरही बंदच होता.कुकडी कालवा समितीची बैठक परवा (मंगळवार) मुंबईत झाली. यावेळी नगर जिल्ह्य़ातील पारनेर, श्रीगोंदे व कर्जत तालुक्यातील ७२ तलावांत शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडल्याचे सदस्यांनी सांगितले. हे आवर्तन काल (बुधवार) सुटणे अपेक्षित होते, मात्र ते आज सायंकाळी बाराशे क्युसेक वेगाने सोडण्यात आले. पाणी ‘टेल टू हेड’ सोडण्यात आले असून सुरूवातीला कर्जत तालुक्यात पाणी पोहचेल. मात्र, तालुक्यातील कोणत्या तलावात पाणी सोडणार, जामखेड तालुक्यातील चौंडी येथील बंधाऱ्यात पाणी सोडणार का, याबाबत अधिकाऱ्यांना कोणतेही निर्देश नसल्याचे सांगण्यात आले. पाणी सुटले तरीही जिल्हाधिकारी निर्देश देत नाहीत, शिवाय मुंबईतील कालवा समितीच्या महत्वाच्या बैठकीला हजर राहत नाहीत यामुळे कर्जतकरांना व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा वाटाण्याच्या अक्षता मिळणार काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water decision pending