देऊळगावराजा परिसरातील खडकपूर्णा नदीवर जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा संत चोखा सागर प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे, परंतु यावर्षी झालेले पावसाचे अत्यल्प प्रमाण, सिंचनासाठी होणारा पाण्याचा वापर, उन्हामुळे होणारे बाष्पीभवन यासह इतर कारणांमुळे या धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने घटत आहे. एकाच महिन्यात या प्रकल्पातील ४.८२ दलघमी पाणी आटले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास काही दिवसात या प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक राहील. दुष्काळ व पाणीटंचाईचे सावट पाहता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करणे गरजेचे झाले आहे.
गेल्या काही वर्षांंपासून सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. दरवर्षी त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येत होते, परंतु पाणीटंचाई संपुष्टात येण्याऐवजी ती अधिकच भीषण होत होती. यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, या उद्देशाने क ोटय़वधी रुपये खर्च करून शेकडो हेक्टर क्षेत्रावर संत चोखा सागर (खडकपूर्णा) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील या सर्वात मोठय़ा प्रकल्पाची साठवण क्षमता १६०.६० दलघमी असून त्यातील मृतसाठा ६७.२०२ दलघमी आहे, परंतु या वर्षी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे हा प्रकल्प अर्धाच भरला होता.
सध्या या प्रकल्पात ४१.८२ दलघमी उपयुक्त साठा आहे, परंतु सिंचनासाठी होणारा पाण्याचा वापर, विविध गावांच्या नळयोजना, उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन यासह इतर कारणांमुळे एकाच महिन्यात ४.८२ दलघमी जलसाठा घटला आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पात ३७ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास काही दिवसातच या प्रकल्पात नाममात्र मृतसाठा शिल्लक राहणार असून शहरासह अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या स्थितीत सिंदखेडराजासह ग्रामीण भागाला पाणीटंचाईने ग्रासले आहे. ऐन हिवाळ्यात सिंदखेडराजासाठी चाळीस टॅंकरचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हीच परिस्थिती देऊळगावराजा व तालुक्याची आहे. ऐन हिवाळ्यात अशी परिस्थिती असेल तर उन्हाळ्यात काय होईल, या भीतीने नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकल्प शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे, परंतु असे असताना देखील शहराला भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी तालुक्याची स्थिती झाली आहे. प्रकल्पाची पाण्याची स्थिती पाहता यातील पाणी सिंचनासाठी न देता पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा