ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून मुंबई, ठाणे महानगरांना पाण्याचा पुरवठा होत असला, तरी या ग्रामीण भागातील गाव-पाडय़ांना अजूनही पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावपाडय़ांची पाण्यासाठीची ही वणवण नेहमीचीच असून, मे महिन्याच्या उन्हामध्ये टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत असतात. अशा गावांना पाण्याची मदत पोहचवण्याचा उपक्रम कल्याणच्या सम्यक संकल्प संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यातील बोरूची वाडी, ओलमणवाडी, आसलवाडी या तीन, तर ठाणे जिल्ह्य़ातील कसारा परिसरातील कोथला, ढाकणे, चिंध्याची वाडी, राईची वाडी, वशाळा या पाच आदिवासी भागात आठवडय़ातून तीन दिवस टॅंकरने पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील पाणीटंचाईच्या झळा एव्हाना तीव्र झाल्या आहेत. ठाणे, रायगड जिल्ह्य़ामधील अतिदुर्गम आदिवासी भागामध्ये प्रत्येक वर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. त्यावर उपाय म्हणून शासनाच्या माध्यमातून अशा पाडय़ांना तसेच गावांना पाणीपुरवठा केला जातो. या शासकीय मदतीवर या भागातील ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागते. शासनाद्वारे पुरवण्यात येणारे पाणी मिळवण्यासाठी मोठा त्रास आणि तितकाच मनस्ताप रहिवाशांना सहन करावा लागतो. टॅकरचे पाणी पुरविण्यात येत असलेल्या गावांना मोठा आकडा दरवर्षी शासकीय यंत्रणेमार्फत जाहीर केला जात असला, तरी तहानलेल्या गावांच्या तक्रारी नेहमीच पुढे येत असतात. त्यामुळे शासकीय प्रयत्नांनंतरही अशा ‘तहानलेल्या’ गावांचा शोध कल्याणच्या सम्यक संकल्प सामाजिक संस्थेने सुरू केला आहे. या संस्थेने अशा गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उपक्रमास सुरुवात केली. ठाणे, रायगडमधील आयुर्विमा कर्मचारी संघटनेने या उपक्रमास पाठिंबा दिल्याने अशा गावांपर्यंत पाणी पोहचविण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. २०१३ मध्ये पहिल्यांदा या संस्थेने पाणीपुरवठा सुरू केला. मे महिन्याच्या १० तारखेपासून या उपक्रमाची सुरुवात केल्यानंतर पाऊस पडेपर्यंत हा उपक्रम ही संस्था चालवते.
विविध सामाजिक संस्था आणि अनेक मान्यवरांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात येत असून, या उपक्रमाला ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांतील नागरिकांना संस्थेच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी ११ मे रोजी या उपक्रमा अंतर्गत कसारा तालुक्यातील दोन गावांना पाण्याचे टॅंकर पोहचवण्यात आले. पुढील आठवडाभर या गावांमध्ये पाण्याचे टॅंकर जाणार असून, त्यानंतर इतर भागातसुद्धा पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव किरण बागुल यांनी दिली. या उपक्रमामध्ये शहरातील नागरिकसुद्धा सहभागी होऊ शकणार आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या डी-५, १०१ मंदार सोसायटी, लोक उद्यान, बैलबाजार रोड, सवरेदय मॉलच्या मागे, कल्याण (पश्चिम) येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. कोणत्या गावांना शासकीय पाणी पोहचत नाही, याचा शोध घेण्यासाठी संस्थेमार्फत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. अशा तहानलेल्या गावांना अधिकाधिक संस्थांची मदत मिळावी यासाठी हा एक लहानसा प्रयत्न असल्याचे संस्थेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे, रायगडातील कोरडय़ा गावांना ‘मदतीचे पाणी’
ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून मुंबई, ठाणे महानगरांना पाण्याचा पुरवठा होत असला, तरी या ग्रामीण भागातील गाव-पाडय़ांना अजूनही पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
First published on: 13-05-2014 at 06:56 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water help for thaneraigad villages