सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडणे व्यवहार्य वाटत नसल्याचे मत आ. जयंत जाधव यांनी मांडले आहे. नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडल्यास आधीच अडचणीत असलेला शेतकरी व सामान्य माणूस अधिक अडचणीत सापडेल. जिल्ह्य़ातून पाणी सोडल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शासनाबद्दल नाराजीची भावना पसरेल. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास आपल्यासह जिल्ह्य़ातील सर्व लोकप्रतिनिधींचा विरोध असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
जायकवाडी प्रकल्प-पैठण धरणात पाणी सोडण्याबाबत शासन पातळीवर चर्चा सुरू असताना नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधील जलसाठय़ाच्या स्थितीकडेही आ. जाधव यांनी लक्ष वेधले आहे. जायकवाडीची वापरण्यायोग्य पाणी साठय़ाची क्षमता ७६६६९ दलघफू आहे. तर त्या धरणात मृतपाणी साठय़ाची क्षमता २६०६२ दलघफू आहे. मृत पाणीसाठय़ामध्ये काही प्रमाणात गाळ आहे. मात्र गाळ वजा जाता शिल्लक असलेला मृत पाणीसाठा व तीन टक्के जिवंत पाणीसाठा विचारात घेता माफक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनांची जॅकवेल धरणातच असते. त्यामुळे मृतपाणीसाठाही वापरता येईल, असेही आ. जाधव यांनी सूचविले आहे.
नाशिक जिल्ह्य़ात गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणे पूर्ण भरलेली नाहीत. दोन वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. मनमाडसारख्या शहरात सध्या वीस दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमध्ये बिगर सिंचन पाणी वापर वजा जाता शिल्लक राहणारे पाणी फार कमी आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, याबाबत कोणाचेच दुमत नसले तरी नाशिक जिल्ह्य़ात या धरणांच्या लाभक्षेत्रात वीस वर्षांपासून जगविलेली काही फळझाडे आहेत. त्यांच्यासाठी पाणी न मिळाल्यास शेतकरी द्राक्षबागा व इतर फळझाडे नाईलाजाने तोडून टाकतील. नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय, पालकमंत्री व जिल्ह्य़ातील इतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊनच घ्यावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. अलीकडेच नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा व निळवंडे या धरणातून २.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. परंतु त्यातील फक्त एक टीएमसी पाणी प्रत्यक्षात जायकवाडी धरणात पोहचले. नाशिक जिल्ह्य़ातील धरणे तर जायकवाडीपासून त्यापेक्षा अधिक दूर आहेत. त्यामुळे नदीपात्रातून होणारा वहनव्यय तसेच १२ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमुळे ७० ते ७५ टक्के पाण्याचा व्यय होणे निश्चित आहे. त्यामुळे प्रत्यक्षात २० ते २५ टक्के पाणी जायकवाडी धरणात पोहचू शकेल, असे आ. जाधव यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा