भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. घाटघर, साम्रद, रतनवाडी भागात सरासरी दहा इंच पाऊस पडला. भंडारदरा, निळवंडे धरणाचा विसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आला असून प्रवरेला पूर आला आहे. हरिश्चंद्रगड परिसरातील पावसामुळे मुळा नदीही दुथडी भरून वाहत आहे.
कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड पटटय़ात नेहमीप्रमाणेच पावसाची रिपरिप सुरू होती. पण मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला. त्यामुळे बुधवारी पहाटे साडेतीन वाजता भंडारद-याच्या यांत्रिकी सांडव्याची दोन्ही दारे चार चार फूट उचलण्यात आली. पहाटेपासून भंडारदरा धरणातून दहा हजार ७८ क्युसेक विसर्ग सुरू होता. निळवंडे धरणाच्या भिंतीतील ७२ फूट रुंदीच्या सांडव्यावरून सकाळी १० हजार ७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. निळवंडे धरणातून आज सायंकाळी धरणातून १२ हजार ४५३ क्युसेक पाणी प्रवरा नदीपात्रात पडत होते. यामुळे प्रवरा नदीला प्रथमच मध्यम स्वरूपाचा पूर आला आहे. निळवंडेच्या पायथ्याशी असणा-या पुलासह इंदोरी आणि अकोलेच्या पुलावरून प्रवरा नदीचे पाणी वाहत आहे.
प्रवरेला आलेल्या पुरामुळे रंधा धबधब्याने रौद्र रूप धारण केले आहे. मात्र धबधब्याच्या निरीक्षण स्थळाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे धबधब्याच्या या रौद्र भीषण रूपाचे जवळून दर्शन घेणे अशक्य बनले आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रालगतच्या कळसूबाई शिखर परिसरात तसेच दक्षिणेकडील कात्राईच्या खिंडीपलीकडील मुळा पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडला. मुळा नदी पहाटेपासूनच पुन्हा दुथडी भरून वाहू लागली. सकाळी मुळा पात्रातून कोतूळजवळ ४ हजार २५० क्युसेक पाणी वाहत होते. मुळा धरणातील पाणीसाठा १९ हजार ९१४ दलघफू झाला आहे. आढळा पाणलोट क्षेत्रातील पट्टाकिल्ला परिसरातही चांगला पाऊस पडला. आढळा धरणातील पाणीसाठा आता ५९० दलघफूपर्यंत पोहचला आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरा धरणात ४११ दलघफू नवीन पाण्याची भर पडली. धरणातील पाणीसाठा १० हजार ५९९ दलघफू स्थिर ठेवून धरणात जमा झालेले सर्व पाणी धरणातून सोडून देण्यात आले. आवक कमी झाल्यामुळे सायंकाळी भंडारद-याचा विसर्ग ७ हजार ९८० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला.
 घाटघरही ४ हजारांच्या पुढे
जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणा-या घाटघरच्या पावसाने रतनवाडीपाठोपाठ आज ४ हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला. आज घाटघरला २४४ मि.मी म्हणजे या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. दि. १ जूनपासून येथे ४ हजार ३४ मि.मी पाऊस पडला आहे तर रतनवाडीला ४ हजार ३२६ मि.मी पावसाची आजअखेर नोंद झाली आहे. रतनवाडीला आज २५२ मिमी ते पांजरे येथे १०६ मि.मी पावसाची नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा