मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांची पावसाळ्यापूर्वीची छत देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण होऊ शकली नसल्याने पहिल्या पावसाने रेल्वे प्रवाशांना मोठा तडाखा दिला असून सकाळी कामावर निघणाऱ्या प्रवाशांची या पावसामुळे पुरती तारांबळ उडू लागली आहे. धो-धो पावसामध्ये स्थानकात उतरल्यावर गळक्या स्थानकात कुठे आसरा घ्यायचा, असा प्रश्न प्रवाशांना पडू लागला आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याणसह पल्याडच्या सर्वच स्थानकांमध्ये अशीच परिस्थिती असून रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे प्रवाशांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा सूर प्रवासी संघटनांनी लावला आहे. छतांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे काही स्थानकांत झाली असली तरी त्यांचा उपयोग मात्र होतच नसल्याचे पावसात
भिजत कार्यालय गाठण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील पहिला सरकता जिना बसवून ठाणे स्थानकाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे मानले जात होते. मात्र त्याच जिन्याच्या अगदी समोरील पायऱ्यांच्या जिन्यामधील, फलाटावरील आणि रेल्वे पुलावरील परिस्थिती बिकट आहे. या भागात वाकडेतिकडे पत्रे बसवण्यात आले असून फुटलेले, छिद्रे पडलेले पत्रे प्रवाशांना पावसाचा जलाभिषेकच घालत आहेत. गाडीच्या दारावरच पत्र्यावरील पाण्याच्या धारा सुरू असून त्यामुळे चढणारे आणि उतरणारे प्रवासी पूर्णपणे भिजतात. ठाणे स्थानकातील एका पादचारी पुलावर चक्क पत्रेच नसल्याने येथून जाणाऱ्या प्रवाशांना छत्री उघडल्याशिवाय पावसातून चालणेच शक्य होत नाही. छतांच्या पत्र्यांची डागडुजी करताना कामचुकारपणा केल्याचा प्रवाशांना फटका बसला असून त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करू लागले आहेत.
डिजिटल यंत्रणाही पावसात..
एटीव्हीएम, सीव्हीएम, इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीमची मेटल डिटेक्टर, लगेज स्कॅनर अशा प्रकारच्या यंत्रणांवरही पावसाच्या पाण्यामुळे नादुरुस्त होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तिकिटे काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना याचा फटका बसतो. इतक्या चांगल्या यंत्रणांची दुर्दशा केवळ छप्पर नसल्याने होत असल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रवक्ते नंदकुमार देशमुख यांनी दिली. रेल्वे नव्या सुधारणांसाठी पैसे खर्च करते, मात्र त्यांची पुरेशी काळजीदेखील घेतली जात नसून हा जनतेच्या पैशाचा अपव्ययच आहे, असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश घनघाव यांनी व्यक्त केले आहे.  

Story img Loader