येथील केड्राई नाशिक आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी चार वाजता ‘जल संवर्धन व व्यवस्थापन’ या विषयावर शिरपूर पद्धतीचे जनक तथा भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. संपूर्ण राज्यात प्रदीर्घ काळापासून पाणी टंचाई व दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी नियोजनाअभावी त्यांची फलश्रृती अपुरी ठरते. यावर पर्याय म्हणून सरकारी अधिकारी सुरेश खानापूरकर यांनी शिरपूर तालुक्यात पाणी व्यवस्थापनावर कमी खर्चात निर्मिलेले प्रकल्प यशस्वी ठरले. शिरपूर पद्धत म्हणून ते ओळखले जातात.
पावसाच्या पाण्यावर बहुतांश शेती अवलंबून असल्याने जलसंधारणास महत्व आहे. तसेच वनजमीनवर प्रचंड प्रमाणावर जंगलतोड झाल्यामुळे व भूजल उपसा मोठय़ा प्रमाणात वाढल्याने नद्या भर पावसाळ्यात कोरडय़ा पडत असल्याचे दिसून येते. जंगलाची अनुपलब्धता, पाणी अडविण्याचे तोकडे प्रयत्न आणि एकाच दिवशी मोठय़ा प्रमाणात पडणारा पाऊस यामुळे बहुतेक सर्व पाणी सुपिक मातीसह अवघ्या काही तासात समुद्रात वाहुन जाते.
या पाश्र्वभूमीवर, खानापूरकर यांनी तंत्रज्ञानावर आधारीत जल संधारणाराला महत्व दिले आहे. त्यात प्रामुख्याने वनीकरण, उगमापासून संगमापर्यंत जास्तीतजास्त पाणी अडविणे, ते पाणी जमिनीत जिरवायला भाग पाडणे, मृद संधारण, उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर या पाच सूत्रांवर जलसंधारणाची प्रक्रिया अवलंबून आहे. धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यात आठ वर्षांपूर्वी त्यांनी जलसंधारणाचे या पद्धतीने काम सुरू केले. आजपर्यंत ६५ दगडी बंधारे बांधण्यात आले असून तीन शेततळे तयार करण्यात आली आहेत.
५९ विहिर पुनर्भरण तसेच पुनर्भरण कालवा विहिरींसाठी नाल्याचे विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात आले. या सर्व कामासाठी एकून सहा कोटी ५५ लाख रुपये खर्च आला. २२ गावांमध्ये केलेल्या या कामांचा सकारात्मक परिणाम तालुक्यातील १४९ गावांमध्ये दिसत आहे. शिरपूर पद्धतीचा अविष्कार जाणून घेण्यासाठी नाशिककरांनी व्याख्यानास उपस्थित रहावे, असे आवाहन केड्राईचे अध्यक्ष किरण चव्हाण व ‘बीएआय’चे विलास बिरारी यांनी केले आहे.

Story img Loader