ठाणेकरांच्या पाणीवापरावर मीटरची ‘नजर’ राहावी यासाठी ठाणे, कळवा, मुंब्रा, घोडबंदर परिसरात सुमारे ९१ हजार मीटर बसविण्याचा पाणीपुरवठा विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या विधानसभा निवडणुका होईतोवर सत्ताधारी शिवसेना-भाजप नेत्यांनी लोंबकळत ठेवण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पासाठी आग्रही असणाऱ्या अभियंता विभागासाठी पाण्याचे मीटर म्हणजे अवघड जागेचे दुखणे होऊन बसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ठाणेकरांना सध्या ‘फ्लॅट रेट’ पद्धतीने महिन्याकाठी १६० ते २२० रुपयांपर्यंत पाण्याचे बिल आकारले जाते. पाणी वापरावर मीटर बसल्यास त्यामध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसू लागल्याने या प्रकल्पाची निविदा अंतिम टप्प्यात असूनही विधानसभा निवडणुकीपर्यंत वेळ मारून नेण्याच्या हालचाली शिवसेनेच्या गोटात सुरू आहेत. विशेषत: घोडबंदर परिसरातील मीटर वापराच्या निविदा लांबाव्यात यासाठी हा दबाव आणखी वाढू लागल्याचे सांगण्यात येते.
पाणीपुरवठय़ाचे ठोस नियोजन व्हावे आणि गळती थांबावी यासाठी मीटर पद्धती अतिशय महत्त्वाची मानली जाते. नवी मुंबईसारख्या शहरात ८० टक्के कुटुंबांना पाण्याचे मीटर बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाची पाण्याच्या वापराची नोंद महापालिकेकडे असते. ठाण्यात मात्र ही महत्त्वाकांक्षी सुधारणा अद्याप अमलातच आणली गेलेली नाही. ठाणे शहरातील काही व्यावसायिक ग्राहकांना पाण्याचे मीटर बसविले गेले आहेत. हा आकडा जेमतेम पाच हजारांच्या घरात आहे. मात्र घरगुती ग्राहकांना मीटर नाहीत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मनमानी पद्धतीने पाण्याचा वापर सुरू आहे, तर काही ठिकाणी पाणी टंचाईसदृश चित्र असल्याचे दिसून येते. काही परिसरात कितीही पाणी वापरले तरी ठरावीक दरानेच पाणी बिल आकारले जात असल्याने पाण्याची नासाडी सुरू असल्याचे चित्रही आहे. यामध्ये बदल व्हावा यासाठी पाण्याचा जेवढा वापर तेवढय़ा प्रमाणात बिल, असे सूत्र महापालिकेने निश्चित केले आहे.
मीटरचा गुंता सुटेना..
ठाणे शहरात सध्या एक लाख ४० हजार ग्राहकांना पाण्याचे बिल फ्ॅलट रेटने आकारले जाते. काही वसाहतींमध्ये पाण्याच्या तीन-चार जोडण्या देण्यात आल्या आहेत. या जोडण्यांना पाण्याचे मीटर नाहीत. नव्या योजनेनुसार या जोडण्यांना तीन टप्प्यांमध्ये मीटर बसविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अभियांत्रिकी विभागाने मध्यंतरी ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ९२ हजार ४९ पाणी मीटर बसविण्याचा प्रस्ताव मंजूर केला. १५ ते ३०० मिलिमीटर व्यासाच्या घरगुती तसेच व्यावसायिक जोडण्यांना मीटर बसविण्याचा प्रकल्प आखण्यात आला. यासाठी सुमारे १७१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले. मात्र केंद्र सरकारने पाणी वितरण व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित अशा प्रस्तावास मंजुरी दिल्याने मीटर बसविण्याच्या कामांचाही यामध्ये समावेश करण्यात आला. दरम्यान, मुंब्रा आणि घोडबंदर अशा परिसरातील सुमारे ६० हजार जोडण्यांना मीटर बसविण्याची कामे पहिल्या टप्प्यात हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली. यापैकी मुंब्रा परिसरातील निविदांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून घोडबंदरची प्रक्रिया लवकरच उरकली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेचा खोडा
पाणी जोडण्यांवर लवकरात लवकर मीटर बसावेत यासाठी पाणीपुरवठा विभाग आग्रही असला तरी विधानसभा निवडणुकीनंतरच ही कामे केली जावीत, असा आग्रह सत्ताधारी शिवसेनेने धरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. घरगुती जोडण्यांना मीटर बसले की पाणी बिलात वाढ होईल, अशीच चिन्हे आहेत. याशिवाय निवडणुकीच्या काळात हा प्रकल्प राबविण्याचा जुगार अंगाशी येऊ शकतो, असे शिवसेनेतील एका मोठय़ा गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे घोडबंदर परिसरातील मीटर बसविण्याची निविदा शक्यतोवर लांबणीवर जाईल, असे प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या गोटातून सुरू झाले आहेत. याविषयी सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याकडे विचारणा केली असता असा कोणताही प्रयत्न शिवसेनेकडून सुरू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मीटर बसविण्याच्या प्रकल्पास सर्व पक्षांनी मंजुरी दिली आहे हे आपण विसरता, असेही ते म्हणाले. निविदाप्रक्रिया सुरू असल्याने ती पूर्ण होताच कामे हाती घेतली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.