घरगुती नळांना मीटर बसविण्याच्या विषयावर झालेली जोरदार चर्चा, त्याला अनुसरून विरोधी शहर विकास आघाडीने केलेला सभात्याग आणि त्याचा लाभ घेत विषयांचे वाचनही न करता सत्तारूढांनी सर्व विषयांना दिलेली मंजुरी अशा गदारोळात सोमवारी इचलकरंजी नगरपालिकेची विशेष सभा पार पडली. असे होत अखेर नळांना मीटर बसविण्याच्या विषयाचे घोडे गंगेत न्हाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रभारी नगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही पहिलीच विशेष सभा होती हेही या सभेचे विशेष होय. दरम्यान, ही सभा बेकायदेशीर असून तसे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देणार असल्याचे ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. वादग्रस्त कचरा फेरनिविदा मागविणे याचबरोबर मंजूर नगररचना योजना क्र. १ व २ या योजनांच्या नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा विषयही पालिका सभेत चर्चेसाठी ठेवला आहे. गॅरेज विभागाकडील वाहनचालक सेवा मक्ता पद्धतीने पुरविण्याबाबतची निविदा मंजूर करणे, इंदिरा गांधी इस्पितळाकडील एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने होणारा दंड माफ करणे अशा विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी नगरपरिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली होती. या वेळी विरोधकांनी मीटरला विरोध दर्शवत सभात्याग केला.मात्र थोडय़ा वेळाने ते पुन्हा परतले. तत्पूर्वीच मिळालेल्या संधीचा लाभ घेत सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय करत सभा संपल्याचे जाहीर केले होते. या वेळी शविआच्या सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सभात्याग करताना विरोधकांनी तर सभा संपल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.विषयपत्रिकेवर घरगुती नळांना मीटर बसविण्याचा विषय पहिलाच होता. या वेळी शहर विकास आघाडीने या मीटरमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून त्याचबरोबर नियमित व मुबलक पाणीपुरवठा केल्यानंतर हा विषय सभागृहात आणावा अशी मागणी लावून धरली. तर सत्ताधाऱ्यांनी मीटर बसविणे कसे गरजेचे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या चर्चेत सत्तारूढ गटाकडून रत्नप्रभा भागवत शशांक बावचकर, संभाजी काटकर, संजय केंगार, शुभांगी बिरंजे, यांनी तर शहर विकास आघाडीकडून अजित जाधव, जयवंत लायकर, महादेव गौड, तानाजी पोवार आदींनी भाग घेतला. सुमारे अर्धा तास चाललेल्या जोरदार चर्चेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवत जोरदार घोषणा देत सभात्याग केला. याच संधीचा लाभ घेत सत्तारूढ गटाने नळांना मीटर बसविण्याच्या विषयाला मंजुरी देताना पुढील विषयांचे वाचनही न करता विषय मंजुरी केल्याचे घोषित करून सभा संपल्याचे जाहीर केले.
सभेनंतर पत्रकारांनी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मीटर बसविण्याला आमचा विरोध नव्हता असे सांगून ही सभाच बेकायदेशीर असून, या सभेतील सर्वच विषयांना स्थगिती द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा