पनवेल नगर परिषदेमधील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यापेक्षा पनवेलमध्ये सोमवारी ठिकठिकाणी नाल्यांचे पाणीही रस्त्यांवर साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळपासून सुरू असलेल्या समुद्राच्या भरतीमुळे काही ठिकाणी पाणी जास्त वेळ साचून राहिल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी पाऊस कमी होण्याची वाट अधिकारी पाहत होते.  
पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी, मिरची गल्ली, कापड गल्ली, युनियन बँक ते शिवाजी चौक या मार्गावर, पायोनियर सोसायटी परिसरात आणि समुद्रसपाटीपेक्षा खोल असलेल्या शहरातील सर्व ठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळाले. आठवडय़ाची सुरुवात करणारा दिवस असल्याने पनवेलकर साचलेल्या पाण्यातून आपल्या ऑफिसची वाट काढत होते. नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा नगराध्यक्षा आणि अधिकाऱ्यांनी केला होता. सोमवारी शहरात साचलेल्या पाण्यामुळे त्यांचा हा दावाही फोल ठरला. अशीच परिस्थिती कळंबोलीतील एलआयजी, केएलवन या बैठय़ा वसाहतींमध्ये होती. येथे घरात पाणी शिरण्याच्या घटना कमी घडल्या तरीही घरातून बाजारात जाण्याची वाट पाण्याखाली गेली होती. के.एल. ५, के. एल. २, के. एल. ४ सारख्या सिडको सोसायटय़ांमधून रस्त्यांपर्यंत येण्यासाठी नागरिकांनी विटा एका फुटाच्या अंतरावर टाकून त्यावरून वाट केली होती. कळंबोली येथे सिडकोने नाल्यांची क्षमता वाढविल्याने यंदाच्या पावसात शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले नाही. खारघरच्या बैठय़ा वसाहतींच्या बाहेरील रस्त्यांच्या कडेला पावसाच्या संततधारांमुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader