अन्यत्र पावसाने चांगली बरसात केल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असताना उमरगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट अजूनही कायम आहे. अपुऱ्या पावसामुळे तालुक्याचा पाणीप्रश्न सुटला नसतानाच प्रशासनाने मात्र तालुक्यातील काही गावांसाठी सुरू असलेले टँकर बंद केल्याने टंचाईत भर पडली आहे.
उमरगा व लोहारा तालुक्यांत जवळपास ४५ तलाव, प्रकल्प आहेत. मागील दोन वर्षांत अतिशय कमी पाऊस झाल्याने हे जलस्रोत भरले नाहीत. त्यामुळे मागील वर्षांत दोन्ही तालुक्यांतील जनतेला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. यंदा पावसाळय़ाचे अडीच महिने लोटले आहेत. मात्र, अजूनही पुरेसा व दमदार पाऊस या तालुक्यांत पडला नाही. परिणामी जकापूर, तुरोरी, बेन्नीतुरा या मध्यम प्रकल्पांसह कोरेगाववाडी, आलुर, कोरेगाव, कोळसूर, केसरजवळगा, मुरळी, चिंचोली, कदेर, तलमोडवाडी, वागदरी, भिकारसांगवी, बलसूर, एकुरगा, जेवळी, धानुरी, माळेगाव, रामनगर, कोराळ आदी २५ तलावांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे. तालुक्यातील १२ तलाव कोरडेठाक आहेत.
गेल्या वर्षी जानेवारीपासून तालुक्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजना सुरू आहेत. जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात त्या सुरू होत्या. जूननंतर अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई सुरू झाली. तेव्हापासून मागील ३१ जुलैपर्यंत अधिग्रहणासह टँकरच्या उपाययोजना सुरू होत्या. परंतु मागील काही दिवसांपासून टँकरही बंद करण्यात आल्याने तालुक्यातील जवळपास २० गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई पुन्हा सुरू झाली आहे. यंदाच्या पावसाळय़ात पावसाने केवळ पिकेच जगवली. पाणीपातळी वाढेल इतपत पाऊस पडलेला नाही. गुंजोटीला पाणीपुरवठा करणाऱ्या जकापूर औराद साठवण तलावातील पाणीसाठा मृत साठय़ाखाली आहे. सध्या तलावात केवळ १५ ते २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. माकणी धरणातही केवळ एक दलघमी पाणीसाठा असून धरणाची पाणीपातळी ५९५.९० असताना सध्या धरणात केवळ ५.१ दलघमी पाणीसाठा आहे. उपलब्ध पाण्यावर उमरगा, निलंगा, औसा परिसरातील ३० खेडी, मातोळा १० खेडी, उमरगा-लोहारा तालुक्यातील २२ खेडय़ांना पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळय़ात तरी चांगला पाऊस होणे गरजेचे आहे. मात्र, स्थिती अशीच राहिल्यास पाणीटंचाईचे संकट मागील भीषण दुष्काळाप्रमाणेच होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader