उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागली असून या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे एकीकडे पाणी वाया जात असताना अनेक गावांना पाणीपुरवठा कमी होत असल्याने आठवडा ते पंधरा दिवसांतून एकदाच पाणी येत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. या पाणीगळतीचा फायदा घेत अनेक ठिकाणच्या जलवाहिन्यांमधून पाणीमाफियांकडून पाण्याची चोरीही केली जात आहे.
राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: मराठवाडय़ात दुष्काळ पडल्याने शेतीला सोडाच, परंतु पिण्यासाठी तसेच आंघोळीसाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याचे विदारक चित्र आहे. तर दुसरीकडे उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. दास्तान ते जासईदरम्यानच्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. तसेच करळ ते बोकडविरादरम्यानच्याही जलवाहिनीला गळती लागलेली आहे. बोकडविरा पोलीस चौकीजवळील जलवाहिनीला गळती लागल्याने जलवाहिनीचे पाणी गटारातून वाहत वाया चाललेले आहे.
तर करळ नाक्याजवळील वळणाशेजारील जलवाहिन्यांना गळती लागल्याने या परिसरात दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या जलवाहिन्यांना पाणीमाफियांचाही विळखा बसला असून अनेक ठिकाणी जलवाहिन्या फोडून पाणीचोरी केली जाते, त्याहीपेक्षा अधिक पाणी वाया जात असल्याने जासई येथील नागरिक एन. जे. म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला आहे.
शुक्रवारी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम
एमआयडीसीचे उपअभियंता एम. के. बोधे यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसांपूर्वी वाजेकर महाविद्यालयाजवळील जलवाहिनीला गळती लागल्याने कामासाठी बोकडविरा येथील काम करायचे राहून गेले असून येत्या शुक्रवारी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर पाणीचोरीसाठी केल्या जाणाऱ्या गळतीच्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, हेटवणे यांच्याही जलवाहिन्या असून नक्की कोणत्या जलवाहिन्यांतून पाणीगळती होते, याची तपासणी केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा