उरण शहरसह तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायती व औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची पातळी घटली असूून अवघा दीड महिना पाणी पुरविता येईल इतकेच पाणी असताना एमआयडीसीच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे एकमेव रानसई धरण आहे. या धरणातील गाळ साठ वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. मात्र वाढलेल्या नागरीकरणामुळे तसेच औद्योगिकीकरणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. ही मागणी पुरविताना एमआयडीसीला चार महिने उसने पाणी घ्यावे लागत आहे. मात्र धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांना करळफाटा, दास्तान, बोकडविरा उरण-पनवेल रस्ता आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गळती लागलेली आहे.
यापैकी अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या जमिनीखाली असल्याने त्या नादुरुस्त झाल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाणी वाया जात असतानाही, आम्ही काय करणार अशी भूमिका घेत एमआयडीसीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एमआयडीसीने वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी जलवाहिन्या दुरुस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. या संदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पाणीपुरवठा करताना पाच टक्के गळती हिशेबात धरली जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकारच्या जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी मातीत जात असल्याने हे पाणी टिकविल्यास पाण्याची बचत होऊ शकते असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

Story img Loader