मराठवाडय़ातील आवश्यक असलेले पाणी नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणातून जायकवाडीत सोडावे, यासाठी औरंगाबाद येथे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्याग्रह करणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी मराठवाडा पातळीवर भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक  २२ ऑक्टोबरला औरंगाबाद येथे आयोजित केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे ही माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, वास्तविक जायकवाडीत पुरेसे पाणी आल्यावर वरची धरणे भरावयास हवीत. परंतु वरची धरणे भरल्यावरही जायकवाडीत पाणी सोडण्याऐवजी त्या भागातील कालव्यांत सोडण्यात आले. पावसाळ्यात कालव्यांऐवजी खाली पाणी सोडले असते, तर जायकवाडी जलाशय ३० ते ३५ टक्के भरला असता. परंतु तसे झाले नाही, हा तर उघड-उघड मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्यावर घातलेला दरोडाच होय. विशेष सत्तेचा गैरवापर करून तो टाकण्यात आला आहे. या संदर्भात मराठवाडय़ातील मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत अधिक जोमाने आवाज उठवावयास हवा होता. परंतु मराठवाडय़ातील मंत्र्यांचा यासाठी दबाव कमी पडलेला दिसतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water political resistance dam