शहरातील विस्कळीत पाणीपुरवठय़ास महापौर संग्राम जगताप यांनी महावितरणला जबाबदार धरले आहे. पाणी योजनेच्या वीजपुरवठय़ात प्रभावी सुधारणा करण्याची त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
नव्या वर्षांतील पहिल्याच महिन्यात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, केवळ खंडित वीजपुरवठय़ामुळेच या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहराच्या पाणीयोजनेचा वीजपुरवठा या महिनाभरात विविध कारणांनी तब्बल बारा दिवस खंडित झाला. अनेकदा त्यांच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने सातत्याने हा व्यत्यय येत आहे. एकदा वीजपुरवठा खंडित झाला, की शहराच्या पाणीपुरवठय़ावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या महिनाभरात त्याची मालिकाच सुरू आहे. विशेषत: गेल्या आठवडाभरापासून हे प्रमाण खूपच वाढले असून पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या असंतोषाचा सामना मनपा पदाधिकाऱ्यांना करावा लागत आहे.
वीजपुरवठय़ातील या अडचणींबाबत मनपाने संबंधितांचे सातत्याने लक्ष वेधूनही त्यात सुधारणा झालेली नाही. त्याचा अधिक त्रास उपनगरातील नागरिकांना होत आहे. तो तातडीने बंद होणे गरजेचे आहे असे जगताप यांनी या पत्रात म्हटले आहे. पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित झालेल्या दिवसांचा सविस्तर तपशीलही त्यांनी महावितरणला दिला असून, नागरिकांच्या भावना व त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करावी व शहराच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा