खडकपूर्णा धरणावरून शहरापर्यंत पाईपलाईन करून देऊळगावराजाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू, हा गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधींना दिलेला शब्द! मात्र, दोन ते तीन वर्षांपासून शहरवासियांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी खडकपूर्णा धरणावरून टँकरने पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, खडकपूर्णा ते देऊळगावराजा या पाईपलाईनसाठी अजूनही शासनस्तरावर मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे शहरवासीयांना यावर्षीही उन्हाळ्यात पुन्हा टँकरद्वारेच पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून शहरवासीयांचे टँकरमुक्तीचे स्वप्न यंदाही भंगणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सध्या देऊळगावराजाला जालना जिल्ह्य़ातील पिरकल्याण धरणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गतवर्षी पडलेला दुष्काळ व यावर्षी झालेल्या कमी प्रमाणातील पावसामुळे जालना जिल्ह्य़ातही तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे असल्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी या धरणातून देऊळगावराजा व सिंदखेडराजाला पाणी देण्यास सक्त विरोध दर्शविला आहे. त्यामुळे देऊळगावराजा येथील नगर पालिकेला पाणी पुरवठय़ासाठी यापुढे सावखेडीभोई धरणावर अवलंबून राहावे लागेल, परंतु या धरणातील पाणीसाठाही जास्त दिवस पुरणार नसल्यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गतवर्षी निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईत शहराला खडकपूर्णा धरणावरून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यावेळेस या टँकर मोहिमेचा सर्वाधिक फायदा तहानलेल्या नागरिकांऐवजी सत्ताधाऱ्यांनाच झाला, हे विशेष. त्यामुळे खडकपूर्णा ते देऊळगावराजा ही पाईपलाईन त्वरित होण्याऐवजी यावर्षी शहराला टँकरद्वारेच पाणीपुरवठा व्हावा, अशी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मानसिकता असल्याचे बोलले जात आहे.
खडकपूर्णा धरणात देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे. त्यामुळे या धरणातील पाण्यावर देऊळगावराजा तालुक्यातील नागरिकांचाच हक्क आहे, परंतु धरण उशाला असूनही तालुका वासीयांच्या घशाला कोरड पडल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकपूर्णा धरण पूर्णत्वास गेल्यानंतर बुलढाण्याचे आमदार विजयराजे शिंदे यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून खडकपूर्णा ते बुलढाणा पाईपलाईन मंजूर करून घेतली. या पाईपलाईनचे कामही लवकरच पूर्णत्वास जाणार असून बुलढाणावासियांना या उन्हाळ्यात या धरणाचे पाणी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे सत्तेत असतांनाही खडकपूर्णा ते देऊळगावराजा पाईपलाईनला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. तांत्रिक अडचणी दाखवून दरवेळी हा प्रस्ताव पुढे ढकलला जातो. आगामी काळात या पाईपलाईनला मंजुरी मिळाल्यास वर्कऑर्डर काढणे, निविदा काढणे, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे, असे अनेक सोपस्कार पार पाडावे लागतील. त्यामुळे या उन्हाळ्यातही पाईपलाईनअभावी यावर्षीही पुन्हा टँकरचीच प्रतीक्षा करावी लागणार, हे निश्चित!
देऊळगावराजाचे टँकरमुक्तीचे स्वप्न यंदाही भंगण्याची चिन्हे
खडकपूर्णा धरणावरून शहरापर्यंत पाईपलाईन करून देऊळगावराजाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू
First published on: 06-12-2013 at 07:47 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem in deulgaon