उरमोडीचे पाणी मिळावे, या मागणीसाठी औंधसह सोळा गावातील ग्रामस्थांनी कराडनजीकच्या ओगलेवाडी येथे राज्यमार्ग रोखून वाहतूक ठप्प केली. तहसीलदार सुधाकर भोसले यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळायलाच हवे, या मागणीसाठी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे व सदस्य कराडला यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी येणार होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ओगलेवाडी येथेच आंदोलनकर्त्यांना थोपविले. तुम्हाला तहसीलदार येथेच भेटतील, असे सांगत पोलिसांनी त्यांना ओगलेवाडी येथेच थांबविले. यावर कृती समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी तहसीलदारांची वाट पाहताना आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार विलंबाने येत असल्याने संतप्त होऊन आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले आणि या रास्ता रोकोमुळे पोलिसांची एकच धांदल उडाली. प्रवाशी व स्थानिकांचे काहीसे हालच झाले. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करून वाहतूक अडवून ठेवू नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली. मात्र, आंदोलनकर्ते अधिक संतप्त झाले. तहसीलदार येथे आल्याखेरीज रस्त्यावरून हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. दरम्यान, तहसीलदार सुधाकर भोसले दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना, समझोत्याचा प्रयत्न केला. आमच्या शेतीला उरमोडीचे पाणी मिळाले पाहिजे. आमची ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी शेती पाणी संघर्ष कृती समितीची बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली.
बैठकीची वेळ आत्ताच निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली. परंतु मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतरही रास्ता रोको झाला आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.